अंबाजोगाई तालुकाआष्टी तालुकाकेज तालुकाकोरोना विषाणू - Covid 19गेवराई तालुकाधारूर तालुकापरळी तालुकापाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यमाजळगाव तालुकाराजकारणविशेष बातमीशिरूर तालुकाशेतीविषयक

संपूर्ण देश लाॅकडाऊन असताना कारखान्यांनी कामगारांना वेठीस धरणे, हा कुठला न्याय? – ऊसतोड कामगारांना झालेल्या मारहाणीवर पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली तीव्र नापसंती

ऊसतोड कामगारांविषयी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा

मुंबई दि.०२:आठवडा विशेष टीम― भिगवण व खेड येथे ऊसतोड कामगारांना झालेल्या मारहाणीवर पंकजाताई मुंडे यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे. ऊसतोड कामगार हे रस्त्यावर विनाकारण फिरणारी मंडळी नाहीत, हे प्रशासनाने ध्यानात घ्यावे असे सांगत सरकारने ऊसतोड कामगारांच्या बाबतीत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. दरम्यान, संपूर्ण देश लाॅकडाऊन असताना साखर कारखान्यांनी कामगारांना वेठीस धरले आहे, हा कुठला न्याय आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश एका वेगळ्या चिंतेत आहे. पोलिस व आरोग्य सेवेतील कर्मचारी या लढाईत मोठ्या धाडसाने काम करत आहेत, त्यांना माझा सॅल्यूट..हया मंडळींना मदत करा असे आवाहन मी वेळोवेळी करते, परंतु ऊसतोड कामगार ही काही रस्त्यांवर विनाकारण फिरणारी मंडळी नाहीत, ती कष्ट करून खाणारी आहेत, जे स्वतःच्या घरापासून कोसो दूर आहेत. संपूर्ण देश लाॅकडाऊन असताना अजूनही काही साखर कारखाने सुरू आहेत, हा कुठला न्याय आहे? कुठल्याही व्यक्तीला स्वतःचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून जे उपाय असतात ते करण्याचा अधिकार आहे, मग तो अधिकार ऊसतोड कामगारांना का नाही? कोणत्याही कामगारांकडून जबरदस्तीने काम करून घेणे अयोग्य आहे असे पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.

सरकारच्या प्रत्येक निर्देशाचे पालन करणे आवश्यकच आहे. माझी सरकारला विनंती आहे की, जे कामगार शहरात आहेत, ज्यांचे हातावर पोट आहे, अशांचा शोध घेऊन त्यांना खाऊ घालणं सोप काम नक्कीच नाही, तरीही त्यासाठी एक व्यवस्थित यंत्रणा राबवावी. प्रत्येक जिल्हयाच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या शाळा, महाविद्यालय किंवा एका मोठ्या वास्तूत त्यांना क्वारंटाईन झोन करावे, सध्याची परिस्थिती गंभीर आहे, कोरोनाची आकडेवारी वाढण्याची शक्यता लक्षात घेता कामगारांना शहरात शांत एक जागी ठेवणे किंवा त्यांच्या घरापासून दूर ठेवणे कठीण आहे पण येणाऱ्या लोकांमुळे कोरोना प्रादूर्भाव जिल्हयातही होऊ नये यासाठी तातडीने निर्णय घेतला गेला पाहिजे.

शांतता व संयम ठेवावा

कामगारांना झालेल्या मारहाणीवर तीव्र नापसंती व्यक्त करते, सरकारने निर्णय घेण्यास विलंब लावला तर कामगार आक्रमक होतील आणि मग अडचण निर्माण होईल अशी भिती त्यांनी व्यक्त केली. ऊसतोड कामगारांनी शांतता व संयम बाळगावा, लवकरच मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.