महाराष्ट्र राज्यराजकारण

विरोधकांचे सरकारवरील आरोप नैराश्येपोटी ; विकासाचा शब्द पाळणा-या भाजपला बहुमतांनी विजयी करा- ना. पंकजाताई मुंडे

लेकीने गाजवले श्रीगोंदा पालिकेच्या निवडणूकीचे मैदान!

आठवडा विशेष|प्रतिनिधी

श्रीगोंदा दि. २२:देशात व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळेच सर्व सामान्य जनतेला न्याय मिळू लागला असून त्यांच्या विकासाचं स्वप्न पुर्ण होत आहे. विरोधकांकडे मात्र आता कोणताही मुद्दा शिल्लक राहिला नसल्याने नैराश्यापोटी ते सरकारवर बेछूट आरोप करत आहेत, अशी टीका राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केली.

श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीतील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनिता शिंदे व १९ नगरसेवकांच्या प्रचारार्थ ना. पंकजाताई मुंडे यांची आज शहरात जोरदार प्रचार सभा झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते. ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचा लेखाजोखा मांडतानाच काॅग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने स्वच्छ व पारदर्शक कारभार करत शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व सर्व सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणले. सामान्य जनतेसाठी उज्ज्वला गॅस, स्वच्छता अभियान, शौचालये, घरकुल आदी योजना यशस्वीपणे राबवल्या. म. गांधींना फक्त नोटांमध्ये पाहणा-या काॅग्रेस- राष्ट्रवादीला त्यांना प्रिय असणारे स्वच्छता अभियान मात्र कधीही राबविता आले नाही. बेघरमुक्त देश व बेघरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिर्डी येथे नुकताच तीन लाख घरांचे वाटप पंतप्रधानांनी केले. केवळ योजना आणून व इमारती बांधून थांबलो नाहीत तर माणसं जोडण्याचे काम आम्ही केले असल्याचे त्या म्हणाल्या. मागेल त्याला शेततळी, जलयुक्त शिवार, ग्रामीण रस्ते, बचतगटांना शुन्य टक्के दराने कर्ज, मुलभूत विकास निधी, एवढेच काय प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते स्मशानभूमी बांधण्यापर्यंतचा निधी आपण दिला असल्याचे त्या म्हणाल्या.

विरोधकांवर हल्लाबोल

गेल्या सत्तर वर्षात काॅग्रेस-राष्ट्रवादीने नुसत्या गप्पा मारल्या, जनतेसाठी कांहीच केलं नाही. नोटाबंदीवरून ते आमच्यावर टीका करतात पण या निर्णयाचा खरा फटका गरीबांना नाही तर त्यांनाच बसला आहे. जनतेचा खरा विकास आम्ही केल्यामुळे त्यांच्याकडे आता कुठलाही मुद्दा शिल्लक राहिला नाही. त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत. जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

वंचितांसाठी राजकारणात

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा दबदबा राजकारणात एवढा होता की मृत्यूनंतरही तो कायम आहे. त्यांनी सामान्य माणसांच्या हिताचं जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्यासाठी आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी मी राजकारणात आलेयं. कितीही संकट आली तरी त्याला सामोरे जात त्यांचे नांव मी जिवंत ठेवणारचं असे त्या म्हणाल्या. श्रीगोंदा शहरासाठी १६३ कोटी रुपयांचा निधी दिला याशिवाय तालुक्याला २५१५ मधून ५ कोटी, मुख्यमंत्री ग्राम सडक मधून १० कोटी तसेच अन्य विभागामार्फत मोठा निधी दिला असल्याचे सांगून भविष्यात निधीची कमतरता भासू देणार नाही त्यामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, तुकाराम दरेकर, प्रतिभा पाचपुते आदींसह भाजपचे पदाधिकारी, सर्व उमेदवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button