बीड:आठवडा विशेष टीम― शहरातील दोन मस्जिदमधुन जमातच्या २४ व्यक्ती तपासणीसाठी काल स्वत:हून पुढे आल्या होत्या. तपासणीनंतर त्यांना मस्जिदमध्ये पाठवण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासुन या २४ व्यक्ती बीडमध्येच असुन त्यांचा दिल्लीतील मरकजमधील धार्मिक कार्यक्रमाशी संबंध नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सदरील व्यक्तींची पेठ बीड पोलिस ठाण्यात नोंदही आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन करण्यात आले आहे.
बीड शहरातील दोन मस्जिदमधुन जमातच्या २४ व्यक्ती स्वत:हन तपासणीसाठी पुढे आल्यानंतर सोशल मिडीयावर याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते तर याबाबतच्या वृत्तानंतर नागरीकांमध्ये भितीही निर्माण झाली होती. मात्र ते २४ जण गेल्या दोन महिन्यांपासुन बीडमध्येच जमातचे काम करत आहेत. या ठिकाणी आल्यानंतर त्यांची पेठ बीड पोलिस ठाण्यात रितसर नोंदही करण्यात आलेली आहे. हे २४ जण परराज्यातील असले तरी ते दोन महिन्यांपासुन बीडमध्येच असल्याने त्यांचा इतरांशी संपर्क आलेला नाही. दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमांशीही त्यांचा संबंध नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.