नंदूरबार, धुळे, जळगावसह राज्यातील २१ जिल्ह्यातील तरुणांना भरतीची संधी
आठवडा विशेष|प्रतिनिधी
धुळे दि. ३१- भारतीय वायू सेनेतील एअरमन पदाच्या भरतीसाठी एअरमेन सिलेक्शन सेंटर, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांच्यातर्फे सोमवार दि. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्य राखीव पोलिस दल मैदान, सुरत बायपास, साक्री रोड, धुळे येथे भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली आहे.
या भरती मेळाव्यासाठी पात्र उमेदवाराची जन्मतारीख १९ जानेवारी १९९९ ते १ जानेवारी २००३ या कालावधीतील असावी. शैक्षणिक पात्रता : उमेदवार बारावीत कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असावा, इंग्रजीत किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. सरासरी ५० टक्के गुण असावेत. उंची- १५२.५ सेंटीमीटर. या भरती मेळाव्यात धुळे, अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, जळगाव, जालना, नागपूर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, यवतमाळ या २१ जिल्ह्यातील अविवाहित तरुणांना सहभागी होता येणार आहे.
या भरतीसाठी ४ फेब्रुवारी, २०१९ रोजी सकाळी ६ ते १० वाजे दरम्यान भरती चाचणीला सुरवात होईल. याच दिवशी शारीरिक पात्रता चाचणी व लेखी परीक्षा होईल. ५ फेब्रुवारी २०१९ रोजी अनुकूलता चाचणी पेपर एक व दोन होतील. तसेच डायनॅमिक फॅक्टर चाचणी होईल. पात्र उमेदवारांनी सोबत येताना दहावीचे मूळ प्रमाणपत्र व त्याच्या ४ छायांकित प्रती, बारावीची मूळ गुणपत्रिका व मूळ प्रमाणपत्र आणि त्यांच्या चार छायांकित प्रती, पासपोर्ट साईज आकाराचे दहा छायाचित्र, राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रमाणपत्र (असल्यास) आणि त्यांच्या चार छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
या भरती मेळाव्यासाठी येताना उमेदवारांनी एचबी पेन्सील, खोडरबर, शार्पनर, गम ट्यूब, स्टॅपलर, काळ्या किंवा निळ्या शाईचा बॉल पॉइंट पेन आणावा. अधिक माहितीसाठी www.airmenselection.cdac.in या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले आहे.