कोरोनाने भोपळ्यागत शेतकऱ्यांचे भविष्य लटकले ,वेल उपटुन टाकले ,शासनाने आर्थिक मदत करावी―डॉ.गणेश ढवळे

पाटोदा:आठवडा विशेष टीम―पाटोदा तालुक्यातील मौजे वैजाळा येथिल शेतकरी निलावती येडे आणि दिपाली येडे यांनी कोरोना विरोधातील लढाईत जिल्हा प्रशासनाने बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने भोपळ्याची शेती वेल उपटुन टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली असुन शासनाने कोरोना प्रकरण संपुष्टात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

निलावती येडे (शेतकरी महिला ):-

शेतामध्ये ठिंबक सिंचन करुन तसेच बेड करणे , औषधं फवारणी करणे ,मजुरांचा पगार आदी एकुण १२ हजार रुपये खर्च झाला वाटलं होतं निदान ३०,००० रु.तरी हातात येतील.पिकसुद्धा भरपुर आले,लोदेच्या लोदे पडलेत .परंतु कोरोना मुळे बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मजुर लावले तर एका दिवसाचे १५०० रु.मजुरी द्यावी लागते.पैसे द्यायचे कुठुन??? म्हणुन आम्ही सून,जावा ,स्वत:च भोपळ्याचे वेल उपटुन टाकत आहोत.

दिपाली येडे ( शेतकरी महिला ):-

कोरोनामुळे बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत, बीड ला घेऊन जायचे म्हणले तर दलाल आर्थिक पिळवणूक करतात. कवडीमोल भावाने विकण्यापेक्षा परत आणावे लागतात,गाडी भाडे पदरून दिले आहे. मजुर कामावर कोरोनामुळे येत नाहीत आणि जास्तीचे मजूर लावुन तोडणे परवडत नाही, कोरोना संपुष्टात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आर्थिक मदत करावी,आता एवढीच हात जोडून विनंती आहे.

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ( किसान सभा तालुकाध्यक्ष बीड, किसान पुत्र आंदोलक ):-

कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत सर्व शेतकरी जिल्हा प्रशासनाच्या पाठीशी उभे आहेत.शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जाते, जिल्हा प्रशासन आणि किसान पुत्र आंदोलक एकत्रित ही लढाई आपण जिंकणारच. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा नायनाट झाल्यानंतर. माणुसकीच्या भावनेतून कष्टाचा विचार करुन पंचनामे करून आर्थिक मदत हातभार लावावा एवढीच नम्र विनंती मा.राहुलजी रेखावार , जिल्हाधिकारी बीड यांना करत आहे.