राज्य सरकार पळ काढतंय– देवेंद्र फडणवीस

मुंबई:आठवडा विशेष टीम― आम्हाला गावी जाऊ द्या, अशी मागणी करत परराज्यातील शेकडो मजुरांनी आज वांद्रे स्टेशनवर धडक दिल्याने सर्वच यंत्रणा हादरल्या आहे त. देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याच्या घोषणेनंतर हा उद्रेक झाल्याने त्यावर आणखीच चिंता व्यक्त होत आहे. यावख्न आता राजकारण ही तापू लागलं असून राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याचं खापर राज्य सरकारवर फोडलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून या घटनेवर भाष्य करताना राज्य सरकारवर टीका केली. जे काही घडले त्याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. वांद्रे येथे हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे, असे नमूद करताना परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असे फडणवीस म्हणाले. राज्य सराकारकडून परराज्यातील मजुरांची पुरेशी व्यवस्था होत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीही राज्य सरकारने त्याबाबत ठोस उपाय केलेले नाहीत. आजच्या घटनेतून तरी राज्य सरकारने धडा घ्यायला हवा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन फडणवीस यांनी केले.