रेशनची दुकानं रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार; छगन भुजबळ यांचे आदेश

मुंबई:आठवडा विशेष टीम―राज्यात कोरोना लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दर महिन्याचे धान्य वाटून प्रति माणसी ५ किलो तांदूळाचे मोफत वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आले आहेत. तसेच हे मोफत धान्य वाटप करण्यासाठी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यत धान्य वाटण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रास्तभाव धान्य दुकानदारांना दिले आहेत.
हे तांदूळ राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील कुटुंबीयांना, अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थी कुटुंबीयांना वाटप करण्याचे आदेश त्यांनी बजावले आहेत. आतापर्यत १२ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत ४ लाख ६० हजार ३८७ रेशनकार्डधारकांना या धान्याचे वाटप करून मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. तर १६ एप्रिल २०२० रोजी सकाळी ८ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यत १ लाख ७ हजार २११ इतक्या रेशन कार्ड धारकांनी तांदळाची उचल केली आहे. सद्यपरिस्थितीत ६९ हजार ८२८ क्विंटल तांदळाचा साठा असून आतापर्यत ३४ टक्के रेशनकार्ड धारकांनी तांदळाची उचल केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
जून २०२० पर्यत मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यासाठी दुकानदारांनी सकाळी ८ रात्री ८ वाजपर्यत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे रेशनकार्ड धाराकांनी दुकानासमोर गर्दी करू नये, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे. तसंच यावेळी सोशल डिस्टन्सिंगचीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे