सोयगाव: ३७ गावात पोहचला मोफत तांदूळ ,सोयगाव तहसील कार्यालयाची मोफत धान्य वितरण मोहीम

सोयगाव,दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य आणि मजुरांची उपासमार टाळावी यासाठी तहसीलच्या पुरवठा विभागाकडून तातडीने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या ३७ गावातील लाभार्थ्यांना तातडीने २८० मेट्रिक टन मोफत धान्य प्रधानमंत्री गरीब कल्यान योजनेतून पुरवठा केल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली आहे.यामध्ये सध्य स्थितीत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतीलच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असून आठवडाभरात उर्वरित योजनेच्या लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.त्यामुळे तूर्तास उर्वरित योजनेच्या लाभार्थ्यांनी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांवर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुक्याला प्राप्त मोफत धान्य योजनेत ४४५ मेट्रिक टन पैकी मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात २८० मेट्रिक टन मोफत तांदूळ लाभार्थ्यांच्या घरात पोहचला आहे.यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब या पात्र धारकांना सध्या या योजनेचा लाभ मिळत आहे.उर्वरित लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध होताच मोफत वितरण करण्यात येईल असेही तहसीलदार पांडे यांनी सांगितले.तालुका पुरवठा अधिकारी नाना मोरे यांनी दुकानदारांच्या सामाजिक अंतराच्या नियमांवर लक्ष देवून आहे,नायब तहसीलदार मकसूद शेख,विठ्ठल जाधव हे दोन्ही नायब तहसीलदार धान्य वितरण व्यवस्थेवर नजर ठेवून असल्याने धान्य वितरण सुरळीत असल्याचे तहसीलदार पांडे यांनी सांगितले.संजय ताले,अव्वल कारकून सुधीर जहागीरदार,अनिल पवार,संतोष नवगिरे,संजय नावकर,आदि याकामी पुढाकार घेत आहे.