कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीशेतीविषयक

बीड: जिल्हाधिकारीसाहेब, भाजीपाला विक्री पुर्वीप्रमाणेच ठेवा ; शेतकऱ्यांची कळकळीची विनंती

बीड:आठवडा विशेष टीम― जिल्हा प्रशासनाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांसह नागरीकांचेही हाल रोज पहायला मिळत आहेत. आडत नसल्यामुळे एकाच ठरावीक भाजीचे किंवा फळाचे उत्पादन घेणारा शेतकरी दिवस-दिवस गल्लोगल्ली फिरूनही त्याचा माल विकत नाही. तोच माल दुसऱ्या दिवशी विकायला आणावा तर संचारबंदी असते. अशा परिस्थितीमध्ये तो माल फेकून देण्याशिवाय दुसरा पर्यायच शेतकऱ्यांकडे नाही. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसानच होऊ लागले असुन कलेक्टर साहेब, भाजीपाला विक्री पुर्वीप्रमाणेच ठेवा अशी कळकळीची विनती शेतकरी करू लागला आहे. बीड शहरासह परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत. नागरीकही या निर्णयामुळे वैतागुन गेले आहेत. सकाळी ७ वाजता घराबाहेर पडल्यानंतर गल्लोगल्ली भाजीपाल्याचे वाहन दिसते का ? हे पाहत फिरावे लागत आहे. एखादे वाहन सापडलेच तर त्याच्याकडे सर्व प्रकारचा भाजीपालाही उपलब्ध नसतो. तीन-चार गल्ल्या फिरून माळवं खरेदी कराव लागत आहे. प्रशासनाने भाजीपाल्याचे दर ठरवुन दिले असले तरी त्याचा कोठेच ताळमेळ जुळत नसल्याचे आज पहिल्याच दिवशी दिसुन आले. ग्रामीण भागातील एखाद्या मोठ्या शेतकऱ्याकडुन आद्रक, लसुन महाग खरेदी करायचा आणि बीडमध्ये येवुन स्वस्त विकायचा का ? असा ही प्रश्न उपस्थित होवु लागला आहे. दिवसभर माळवं विकल्यानंतर पुन्हा संध्याकाळी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना विक्रीविषयी रिर्पोटींग करायचे. त्यामुळे या सर्व झंझटीपेक्षा माळवं शहरात न नेलेले बरे ! असे म्हणण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर आली आहे. कृषी विभागाच्या कार्यालयातुनही परवाने देण्याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू असुन नवीन अर्ज घेण्यासही नकार दिला जात आहे.