ऊसतोड करून आपण परत आपल्या जिल्ह्यात आला आहात का..? मग करा या सूचनांचे पालन

पाटोदा:दत्ता हुले―
राज्यातील विविध साखर कारखान्यातील ऊसतोड कामगार,ऊस वाहतूक करणारे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मुळगावी पाठविण्याबाबत शासन आदेश प्राप्त झालेले आहेत. या शासन आदेशानुसार बाहेरील जिल्हयातून ऊसतोड कामगार जिल्हयामध्ये येणार आहेत. यांची काटेकोर वैद्यकीय तपासणी करून ॲप द्वारे ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत .
करोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना नुसार चेकपोस्टवरील आदेशातील अधिकारी व कर्मचारी यांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्ह्याच्या येणाऱ्या विविध मार्गांवर वैद्यकीय अधिकारी पोलीस अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचार्‍यांच्या माध्यमातून सुसज्ज यंत्रणा उभी करण्यात आले आहे
१) उपरोक्त शासन आदेशानुसार बाहेर जिल्हयातून ऊसतोड कामगार जिल्हयामध्ये येणार आहेत. त्यांच्याकडे विहित नमुन्यात वैद्यकीय तपासणी केल्याचे प्रमाणपत्र आहे का याबाबत खात्री करावी, प्रमाणपत्र नसल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी सोबत दिलेल्या विहित नमुन्यात करावी.
२) प्रत्येक नागरीकांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात यावा व पुढील २८ दिवसाची तारीख टाकण्यात यावी.
३) आरोग्य कर्मचारी यांनी एन्फ्रारेड थर्मामीटरने तापमान मोजावे व त्याची नोंद घ्यावी, तापमान १०० पेक्षा जास्त असल्यास वैद्यकीय अधिकारी यांचेकडून तपासणी करुन घ्यावी. तरशिक्षकांनी होम क्वारंटाईनचा शिक्का मारावा.
४) वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार सक्षम असलेल्या नागरिकांना जिल्हयातील त्यांच्या गावात अलगीकरणाची व्यवस्था मा.जिल्हाधिकारी यांच्या उपरोक्त संदर्भ क २ चे आदेश दिनांक १८/०४/२०२० नुसार करावे. सदर अलगीकरणाचा कालावधी बीड जिल्हयात आल्यापासून २८ दिवसांचा राहिल. त्यानंतर त्यांना अलगीकरणामधून मुक्त करण्यात यावे.
५) आलेल्या नागरिकांपैकी कोणाला काही लक्षणे असल्यास सदर नागरीकाला व त्यासोबत आलेल्या सर्व नागरीकांना त्या चेकपोस्टवरुन संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल करावे.
६) सर्व नागरिकांना शेतात/शाळेत पाठविण्यापूर्वी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत समुपदेशन करण्यात यावे व हस्तपत्रिका (Hand bill) देण्यात यावी.
७) तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येक चेक पोस्टवर एक रुग्णवाहिका व पुरेसा आवश्यक औषधसाठा राहील याची दक्षता घ्यावी.
८) सर्व नागरिकांची दोन प्रतीत गावनिहाय यादी तयार करावी व सदर सर्व नागरिकांची नोंद ezee Form App मध्ये घेण्याकरीता सदर यादी गटविकास अधिकारी यांचेकडे देण्यात यावी.
९) सोबत जोडलेल्या आदेशामधील काही कर्मचारी उपलब्ध न झाल्यास पर्यायी कर्मचारी उपलब्ध करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी यांची राहील.
राज्य शासनाने करोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना केलेली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे.
या आदेशांची अवाज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता १८६०(४५) याच्या कलम १८८ शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल असे निर्देशीत केले आहे.