परळी विभागात 23 एप्रिल पासून कापूस खरेदी सुरू होणार ―राज्य उपाध्यक्ष अॅड. विष्णुपंत सोळंके, संचालक राजकिशोर मोदी यांची माहिती

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― परळी विभागातील कापूस खरेदी केंद्रांमध्ये गुरूवार,दि.23 एप्रिल पासून पुन्हा
कापूस खरेदी सुरू करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके व संचालक राजकिशोर मोदी, भारत चामले यांनी दिली आहे.

2014-15 ते 2019 पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला बाजारात शासनाच्या हमीभावा पेक्षा जास्त भाव होता.2018- 19 साली कापसाला 4100/- रुपये भाव होता. त्यामुळे शेतकरी हे महासंघाकडे आपला कापुस देत नव्हते.सध्या महासंघ कापसाला 5 हजार 550 रूपये एवढा भाव देत असल्याने व आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या किंमती कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीकडे पाठ फिरवली. महाराष्ट्र शासनाचा अंगभूत घटक म्हणून व शासनाच्या वेळोवेळी सूचनेनुसार महासंघाने शेतकऱ्यांच्या कापसाला प्रतवारी प्रमाणे कापुस खरेदी सुरू करून चांगला भाव दिला.ही खरेदी 20 मार्च 2020 पर्यंत सुरू होती.दुर्दैवाने कोरोना साथजन्य रोगामुळे शेतकऱ्यांची काळजी म्हणून खरेदी बंद केली.परळी विभागात लातूर,बीड आणि उस्मानाबाद हे जिल्हे आहेत.यावर्षी राज्याच्या कापुस खरेदीस 27 नोव्हेंबर रोजी अमरावती येथे तर मराठवाड्यात माजलगाव येथे 28 नोव्हेंबर 2019 रोजी सुरूवात झाली.आतापर्यंत परळी विभागात सुमारे 15 लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून बहुतेक सर्व शेतकऱ्यांचे कापूस खरेदीचे पैसे अदा करण्यात आले आहेत.ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनियमितता आढळली केवळ त्यांचेच पैसे राहिले आहेत.परळी विभागातील शेतकऱ्यांकडे सुमारे 3 ते 4 लाख क्विंटल एवढा कापूस शिल्लक असू शकतो. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे व प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे,पणन महासंघाचे संचालक राजकिशोर मोदी हे प्रयत्नशील राहिले.त्या दृष्टीने मा.जिल्हाधिकारी यांनी सोमवार,दि.20 एप्रिल रोजी बीड येथे बैठक आयोजित केली होती.या बैठकीत राज्याचे उपाध्यक्ष अॅड. विष्णुपंत सोळंके,जिल्हा सहकार निबंधक बडे साहेब व पणन महासंघाचे अधिकारी उपस्थित होते.त्यानुसार सोशल डिस्टन्स पाळून,मास्कचा वापर करून पूर्वीच्याच खरेदी केंद्रांवर पणन महासंघाच्या देखरेखीखाली कापूस खरेदी करण्यात येईल.एका दिवशी एका जिनिंगवर फक्त 20 वाहने यांनाच अनुमती दिली आहे.अनुमतीप्रमाणे 23 एप्रिल 2020 पासून सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कापूस खरेदी केली जाईल अशी माहिती पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके,माजी उपाध्यक्ष तथा संचालक राजकिशोर मोदी,संचालक भारत चामले यांनी दिली आहे.

कापुस खरेदीने मिळेल शेतक-यांना दिलासा

विदर्भ,मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुक्यात कापूस पिकवला जातो.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस सध्या त्यांच्या घरांमध्ये आहे.तो खरेदी करण्याचा स्वागतार्ह निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.याबाबत मा.जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन मध्ये असणाऱ्या सुचनांचे पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार होणार आहेत. यामुळे कापुस उत्पादक शेतक-यांना मोठा आधार व दिलासा मिळणार आहे.
-अॅड.विष्णुपंत सोळंके (उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघ.)

बाजार समित्यांकडे 25 हजार शेतक-यांची नोंदणी

शेतकऱ्यांचे अर्थकारण हे कापूस उद्योगावर अवलंबून आहे.यंदा महाराष्ट्रात कापसाचे उत्पन्न चांगल्या प्रकारचे झालेले आहे. चांगल्या प्रतीचा कापूस उत्पादन झाला आहे. शेतीपूरक उद्योगांना मुभा देण्याची केंद्र व राज्य शासनाची भूमिका आहे. विदर्भ,मराठवाडा,खान्देश या विभागातील जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या असून कोरोना व लॉकडाऊन काळातील सूचनांचे पालन करून कापूस खरेदी करण्यात यावी.शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी केंद्रावर आणावा.कापूस खरेदी केंद्र व कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी संयुक्तीक नियोजन करीत आहे.13 मार्च 2020 पर्यंत बाजार समितीकडे पुर्वनोंदणी केलेल्या शेतक-यांचाच कापुस घेतला जाईल.सुमारे 25 हजार शेतक-यांनी अशी नोंदणी केली आहे.ज्या शेतक-यांनी पुर्वनोंदणी केली त्याच शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी,कोणत्या वेळेत कापूस केंद्रावर आणावा हे त्यांना कळवले जाणार आहे.कापसाची प्रत तपासून त्याचे वजन करून कापूस खरेदी केली जाईल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील कापसासह घरांमध्ये सुरक्षितता म्हणून साठवून ठेवलेला कापूसही खरेदी केला पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे.
-राजकिशोर मोदी (संचालक,महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघ.)