पांगरी तांडा येथील गावकर्यांनी निर्माण केला आदर्श
परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―
पोलीस व प्रशासनावर विसंबून न राहता व नेहमी च्या थातुरमातुर होणार्या कारवायाला कंटाळून शेवटी गावकऱ्यांनीच एकजूट केली आणि गावात तयार होणारी गावठी दारू पूर्णतः बंद पाडली. परळी तालुक्यातील पांगरी तांडा येथील महिला व तरुण यांनी एकत्र येऊन आपल्या तांड्यावर यापुढे दारू निर्माण होऊ द्यायची नाही असा एकमुखी निर्णय घेत आज (दि.१०) सर्वांनी मिळून तांड्यातील विविध ठिकाणी तयार होणारे दारुअड्डे व दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य उध्वस्त करून टाकले. याबाबत ग्रामीण पोलीसांना माहिती दिली असली तरी अद्याप याप्रकरणी पोलिसांनी काहीही नोंद केलेली नाही.
परळी तालुक्यातील पांगरी तांडा येथे गावठी दारू तयार केली जात होती.या ठिकाणी बाहेरून अनेकजण दारु पिण्यासाठी येत होते. बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली होती .सध्या कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अतिशय सतर्कता घेतली जात आहे. ठिकठिकाणी तपासणी करून व बाहेर गावच्या लोकांना गावात प्रवेश दिला जात नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. राज्यभरात विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. अत्यावश्यक सोडता संपूर्ण दुकाने आणि संस्था बंद ठेवण्यात येत आहेत. फिजीकल डिस्टंन्स पाळून सर्व व्यवहार पार पाडले जात आहेत. विविध माध्यमांतून या बाबतीत जनजागृती केली जात आहे. असे असताना दारुच्या कारणाने पांगरी तांडा येथे बाहेरचे लोक मोठ्या प्रमाणावर दाखल होत होते. ही बाब गावातील महिला व तरुण यांनी लक्षात घेऊन एकत्र येऊन आपल्या तांड्यावर दारु निर्मितीच होऊ द्यायची नाही असा एकमुखी निर्णय घेतला.
यापुर्वी अनेक वेळा पोलीसांनी कारवाया केल्या मात्र त्या थातुरमातुर ठरल्या. पुर्णतः या अवैध धंद्याला मात्र कधीच पायबंद बसला नाही.यामुळे पोलीस व प्रशासनावर विसंबून न राहता शेवटी गावकऱ्यांनीच एकजूट केली आणि गावात तयार होणारी गावठी दारू पूर्णतः बंद पाडली. यामध्ये परिसरातील आठ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली.तसेच अंदाजे 200 ते 250 लिटर गावठी दारु,1000 लिटरच्या आसपास गोडव्याची टाकी फोडण्यात आली. दारु , गोडवा,गुळ आणि अल्कोहोल पध्दार्थ असे साहित्य उद्धवस्त करण्यात आले आहे. या निमित्ताने पांगरी तांडा येथील गावकर्यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.