पैठणला केमिकल कंपनीत स्फोट : आगीचे लोळ, पंधरा किलोमीटरपर्यंत गेला आवाज

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या एमआयडीसी येथे अत्यावश्यक सेवेत सुरू करण्यात आलेल्या शालिनी केमिकल कंपनीमध्ये बुधवारी (दि.२२) सकाळी केमिकल टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता, की पंधरा किलोमीटरपर्यंत त्याच्या आवाजाचे हादरे गेल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पैठण शेजारील एमआयडीसी येथील शालिनी केमिकल कंपनीमध्ये लहान मुलांच्या पोटातील जंताच्या औषधांचा कच्चा माल तयार केला जातो. या कंपनीतील केमिकलच्या टाकीचा स्फोट झाला. या कंपनीत रात्रीच्या शिफ्टमध्ये तीन कामगार व एक सुरक्षारक्षक होता, मात्र सकाळी शिफ्ट संपल्याने ते कामगार गेटजवळ आले आणि तेवढ्यात कंपनीमधील आठ स्टोअरेज टाक्यांपैकी एका टाकीचा स्फोट झाल्याने त्यातील १२०० लिटर केमिकल बाहेर फेकले गेल्याने तात्काळ पेट घेतला.

कंपनीच्या वरच्या भागात आगडोंब उसळला व स्फोटाचा आवाज जवळपास १५ किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरातील कंपनी इमारती व उभ्या वाहनांच्या काचांना तडे गेले. आवाजामुळे एमआयडीसी व परीसरातील लोक अचानक झालेल्या आवाजामुळे घाबरून घराबाहेर आले असता कंपनीमध्ये उसळलेला आगडोंब दिसला.

एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेत आजुबाजूचे रहदारीचे रस्ते तात्काळ बंद करून निर्मनुष्य केले. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली कंपनी ही प्लाॅट क्रमांक ए -७५ मध्ये असून ती शिरीष कुलकर्णी यांच्या मालकीची आहे.

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने भेट देऊन पाहणी केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, फौजदार विद्या झिरपे, सहाय्यक फौजदार अशोक महाले, प्रदीप जाधव, बाॅंब शोधक पथकाचे फौजदार भाऊसाहेब एरंडे, गोरखनाथ शेलार, सुनील दांडगे, शत्रु्घन मडावी उपस्थित होते.