कोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

#CoronaVirus: कोरोना संदर्भात सर्व उपचार निशुल्क; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती

लातूर:आठवडा विशेष टीम― कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात होणारे उपचारनिशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार यापुढे निशुल्क होणार आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेकडून कोविड-19 प्रादुर्भावास महामारी घोषित करण्यात आले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोविड-19 संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे निशुल्क करण्यात आले आहेत. कोविड -19 बाधित रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत व यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 संक्रमित रुग्णांवर उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात, असा अनुभव आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील. त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार असल्याने कोविड-19 ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल असेही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.