#CoronaVirus फळ बागायतदार शेतकरी,विक्रेत्यांना फळे विक्रीची परवानगी द्यावी ; मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

अंबाजोगाई:रणजित डांगे― फळ बागायतदार शेतकरी आणि विक्रेत्यांना फळे विक्री करण्याची परवानगी देऊन दिलासा द्यावा अशी
मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचेसह विविध मान्यवर नेते व जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे.याबाबत अॅड.इस्माईल गवळी,फळ बागायतदार शेतकरी आणि विक्रेते यांनी गुरूवार,दिनांक 23 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोरोना (कोविड-19) या साथरोगाचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या उद्देशाने बाजारपेठेत जनसामान्यांची गर्दी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने “लॉकडाऊन” चा निर्णय घेतल्यामुळे मागील 1 महिन्यांपासून नागरीकांनी आपापले व्यवहार,दुकाने,आस्थापना बंद ठेवून शासन आदेशाचे पालन केल्याचे आपणास ज्ञात आहेच.असे की,ज्या जिल्ह्यात कोरोनाचा एक ही रुग्ण नाही.अशा जिल्ह्यांत
“लॉकडाऊन” मधुन काही जिवनावश्यक बाबींच्या खरेदी,विक्री करीता संचार बंदी शिथील करणे बाबत शासन आदेश निर्गमित केलेले आहेत.सुदैवाने बीड जिल्ह्यात कोरोनाचा एक ही रूग्ण आढळून आलेला नाही.म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी त्यांचे संदर्भीय आदेशान्वये जिवनावश्यक वस्तुंच्या व इतर बहुतांश सेवा सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे.परवानगी नुसार अंबाजोगाई शहरात वंश परंपरागत फळ विक्रीचा व्यापार करणा-या ठोक विक्रेत्यांनी शेजारच्या जिल्ह्यांतुन,राज्यांतुन सफरचंद,आंबे,अंजीर, अननस,टरबुज,खरबुज,
किवी,द्राक्षे,मोसंबी,डाळिंब, नारळ,केळी इत्यादी फळे व कांदे,बटाटे,लसून,आद्रक इत्यादी जीवनावश्यक वस्तू विक्रीकरीता मागविल्या मात्र शासकीय यंत्रणेमध्ये
असलेल्या नियोजनाभावी, मुख्याधिकारी,नगरपरिषद अंबाजोगाई यांनी संबंधित फळ विक्रेत्यांना वेठीस धरून आवश्यक असलेली परवानगी देण्यास नकार दिल्यामुळे भाजी मंडई, अंबाजोगाई सध्या तरी बंदच आहे.त्यामुळे फळांची नासाडी झाली असून अक्षरश: फेकून द्यावे
लागले.ज्याची दखल प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाने घेऊन घेऊन वृत्त प्रकाशीत केले आहे.या प्रकारामुळे शेती पिकविणा-या शेतक-यांसह अंबजोगाई शहरातील ठोक व किरकोळ फळ विक्रेते व सुमारे 450 हातगाडीवाले यांचे लाखो रूपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले व होत आहे.सध्या आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.रमजान महिना असून फळांची मागणी वाढली आहे.बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळेल.तसेच पर्यायाने रूग्णांना देखील फळांचा आहार मिळत नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर देखील विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शेजारच्या जिल्ह्यांतून, राज्यांतून शेतक-यांकडून व बाजारपेठेतून सदरची फळे व भाजीपाला इत्यादी वस्तु अंबाजोगाईतील भाजी मंडी वितरण व्यवस्थेमार्फत मास्क वापरून तसेच सर्व नियम पाळून हातगाडीवाल्यांना थेट शहरामधील गल्ली बोळात जाऊन विक्री केला जात असल्यामुळे सोशल डिस्टन्सींगचा प्रश्न देखील निकाली निघतो.कारण,वरील नमूद वस्तुंच्या गरजा पुर्ण करण्यासाठी नागरीक घराबाहेर पडणार नाहीत व त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होणार नाही.पर्यायाने शेतक-यांचा माल ही वेळीच विकला जाईल जेणे करुन
त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही असे निवेदनात नमूद केले आहे.निवेदन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार,कृषिमंञी दादा भुसे,पालकमंत्री ना धनंजय मुंडे,जिल्हाधिकारी बीड यांना मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.निवेदनावर 1)अॅड.आय ए.गवळी,2) अभिमन्यु सोनपीर,3) प्रकाश केंद्रे,4)नरसिंग केंद्रे,5)संतोष घोडके,6)नरहरी धुमाळ,7)आबासाहेब शिंदे,8)किशोर डाके,9)सावता जिरे,10)ईश्वर बोर्डे,11) मयुर पवार,12)विलास चव्हाण,13)दत्तात्रय घोडके,14)व्यंकट साखरे,15)पांडूरंग साखरे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

सरकार व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करू

शेतकरी,फळ विक्रेते, हातगाडीवाले (फेरीवाले) यांचेवर अवलंबून असलेल्या सर्व कुटूंबीयांच्या हितार्थ सरकार व प्रशासनाने दखल घेऊन उदरनिर्वाहाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून भाजी-फळे मंडई अंबाजोगाई सुरू करावी. मा.मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हा प्रशासन तसेच मुख्याधिकारी,नगर परिषद अंबाजोगाई यांना कृपया आवश्यक त्या सुचना तातडीने द्याव्यात ही कळकळीची विनंती.त्या करीता सोशल डिस्टन्सींगसह शासनाने लागु केलेल्या इतर आवश्यक त्या सर्व अटींचे पालन करण्यास आम्ही बांधील आहोत.
-अॅड.इस्माईल गवळी (प्रतिनिधी,हातगाडी विक्रेते,अंबाजोगाई.)