उस्मानाबाद:आठवडा विशेष टीम―मराठवाडा जनविकास संघाने उचलला माकडांच्या खाद्याचा भार. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही झळ पोहचत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ( परांडा ) सोनारी येथे माकडांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. येथील कालभैरवनाथ मंदिर सुरक्षिततेसाठी भाविकांसाठी बंद असल्याने माकडांना खायला मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांना पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व सोनारी ग्रामस्थांच्या वतीने खाद्य पुरविण्यात आले आहे.या सुविधांचा शुभारंभ मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भैरवनाथ अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष महेश कारकर, कोषाध्यक्ष रविंद्र खुळे, सहसचिव अशोक माने, सदस्य भिमा घाडगे, डोनजे गावचे सरपंच गजेंद्र सूर्यवंशी, संतोष भोरे, बापू शिंदे, विलास शिंदे, दिनेश घोगरे, सचिन भोरे, विनायक गंगाविठ्ठल, अक्षय भोरे, अशोक भोरे, चंद्रकांत भोरे, हनुमंत गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
येथील माकडांसाठी काकडी, डाळिंब, केळी, गाजर, टोमॅटो, मक्याची कणसे, पपई आदी खाद्य पुरविण्यात आली आहेत. त्यामुळे ४५० ते ५०० माकडांची उपासमार टळण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षापासून तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यातील जनावरांना व वन्य प्राण्यांना पाण्याअभावी जिवास मुकावे लागू नये, म्हणून सिमेंटच्या ५०० लिटर क्षमतेच्या १०७ टाक्या ठेवून ‘ पशुधन वाचावा ’ मोहीम हाती घेतलेली आहे. त्यामुळे माकडे, हरिण, भटकी जनावरे, मोर, इतर पक्ष्यांची पाण्यावाचूनची ससेहोलपट थांबण्यास मदत झाली आहे.