डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे सामाजिक भान ; संपूर्ण पाथरा गावास वाटले मास्क

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोना साथरोगाच्या संकटकाळी आपली जबाबदारी ओळखून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम समाजात काही मोजके लोक,संस्था,संघटना, आस्थापना करीत आहेत.आपल्याकडे काही नसताना ही इतरांना मदत व सहकार्य करण्याचा दातृत्वपणाचा गुण फार कमी लोकांमध्ये पहावयास मिळतो.असेच लोकहिताचे काम सातत्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळा करीत आहे.सामाजिक भान व बांधिलकी जोपासत या शाळेने संपूर्ण पाथरा गावास मास्क दिले असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष लहू बनसोडे यांनी दिली आहे.

बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील मौजे पाथरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष लहू बनसोडे यांच्या वतीने सध्या राज्यावर आणि देशावर कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवु नये व आपत्कालीन परिस्थितीवर कोरोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी आपल्याच गावातून चांगली सुरूवात व्हावी या अनुषंगाने तसेच शासनाला सहकार्य व्हावे या भावनेतून पाथरा गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला घरपोहोच मास्कचे वाटप करण्यात आले.विशेष म्हणजे सन 1998 पासून ही आश्रम शाळा सुरू आहे.2006 साली या शाळेला कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता मिळाली.तेव्हा पासून एक रूपयाचे अनुदान नसताना ही संस्था आणि कर्मचारी हे एकत्र आले.कोरोना आपत्कालीन परिस्थितीत शासनाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.हे विशेष.डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळेने सामाजिक बांधिलकी जोपासत गोरगरीब आणि वंचित समुहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दर्जेदार शिक्षण देवून आपुलकीने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य करीत आहे.
सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाने अक्षरशः थैमान घातले आहे.याचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.परंतु,यात जनतेचाही सहभाग असणे गरजेचे आहे.मास्क लावणे वेळोवेळी हात धुणे,सोशल डिस्टन्स पाळणे हे गरजेचे असताना अनेक ठिकाणी शासनाच्या आदेशाची पालन होत नाही.विशेष म्हणजे शहरापेक्षा ग्रामीण भागात याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. याच विषयी चिंतन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष लहू बनसोडे आणि कर्मचारी यांनी शासनाला सर्वतोपरी सहकार्याच्या भावनेतून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपले गाव कोरोना मुक्त आणि सुरक्षित राहावे या अनुषंगाने मौजे पाथरा येथील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मास्क देण्याचे ठरवले.त्यानुसार पाथरा गावच्या सरपंच अपर्णा प्रवीण पवार, उपसरपंच काशिनाथ पवार यांच्याकडे आश्रमशाळेच्या वतीने मास्क सुपूर्द करून उपस्थित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सुरभी वाघमारे,संस्थाध्यक्ष लहू बनसोडे,आश्रमशाळेचे सहशिक्षक,कर्मचारी यांनी गावातील नागरिकांना मास्क देऊन सुरक्षितता विषयी मार्गदर्शन केले.तर याविषयी सरपंच अपर्णा पवार यांनी सांगितले की, आश्रमशाळेने राबवलेला उपक्रम हा स्तुत्य असून ग्रामपंचायतच्या वतीने अनेक वेळा निर्जंतुकीकरण तसेच समुपदेशन करून वेळोवेळी नागरिकांना सूचना केलेल्या आहेत.
विशेष म्हणजे संपूर्ण भारतात एखाद्या खेडेगावात प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मास्क देणारे आश्रमशाळेचे संचालक लहू बनसोडे हे आदर्श नागरिक असून भारतातील प्रत्येक खेड्यातील ग्रामपंचायतने किंवा एखाद्या संस्थेने पुढे येऊन मास्कचे वाटप करणे ही काळाची गरज वाटते.कारण,शासनाच्या आदेशानुसार अनिश्चित काळासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे.तरच अशा आपत्तीजनक परिस्थितीतून आपण स्वतःला आणि देशाला सावरू शकतो लहू बनसोडे यांनी घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.