सोयगाव,दि.२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
घोसला ता.सोयगाव शिवारातील एका कोरड्याठाक विहिरीत तब्बल २५ कॅन गावठी दारू गाळपचे रसायन शनिवारी दुपारी सोयगाव पोलिसांनी लॉकडाऊनचं गस्तीत जप्त करून नष्ट केले आहे.या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली असून अद्याप रसायनाची किंमत हाती आली नाही.
लॉकडाऊनची गस्तीत असलेल्या पोलिसांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार घोसला शिवारात एका कोरड्या विहिरीत हजारो रु किमतीचे गावठी दारू गाळप करण्याचे रसायन लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घटनास्थळावर छापा घातला असता,त्या कोरड्याठाक असलेल्या विहिरीत तब्बल २५ कॅन गावठी दारू गाळपचे रसायन शनिवारी हस्तगत करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष किशोर पाटील व प्रकाश पाटील सरपंच,निमखेडी पोलीस पाटील भगवान शिंदे यांच्या समक्ष हे रसायन नष्ट करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात छुप्या मार्गाने गावठी दारू गाळप करून विक्री करण्याच्या उद्देशाने अज्ञातांनी हे रसायन लपवून ठेवल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,जमादार संतोष पाईकराव,दिलीप तडवी,विनोद कोळी आदींच्या पथकाने हि कारवाई केली आहे.