20 फेब्रुवारी रोजी भिम आर्मीचे आमरण उपोषण
अंबाजोगाई (वार्ताहर) खासगी शिकवणी वर्गामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के प्रवेश विनामुल्य द्या या सहीत खाजगी क्लासेसवर नियंत्रण आणावे,याबाबत समिती गठीत करावी, विद्यार्थ्यांना भौतीक सुविधा मिळाव्यात, दिलेल्या प्रवेश शुल्काची रितसर पावती मिळावी, शहरातील खासगी शिकवणी वर्गांची नियमीत तपासणी व्हावी आदी विविध मागण्यासंदर्भात भीम आर्मीच्या (भारत एकता मिशन) वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत आचार्य यांनी शुक्रवार, दि.15 फेब्रुवारी रोजी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या प्रश्नांवर ते बुधवार,दि.20 फेब्रुवारी रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.
अंबाजोगाई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर खासगी शिकवणी वर्ग चालविले जातात. त्यामध्ये गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे यासाठी काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्यांना नाविलाजाने या खासगी शिकवणी वर्गामध्येे प्रवेश घ्यावा लागतो. यावेळी खासगी शिकवणी वर्गाच्या वतीने भरमसाठ फी आकारली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना यामुळे फिची पुर्तता न करता आल्याने मानसिक व आर्थिक ताण सहन करावा लागून कुटुंबाला कर्जबाजारी होण्याची वेळ येते.खाजगी शिकवणीमुळे समाजात गरीब व श्रीमंत असा भेदभाव निर्माण होत आहे.खासगी शिकवणी वर्ग हे शासनाच्या कोणत्याही नियम व अटीत बसत नसल्याने यावर शिक्षण विभागाचे कुठलेही नियंत्रण नाही. प्रसंगी अनेक खाजगी शिकवणी वाले जाहिर डिजीटल फलक लावून आमच्या वर्गामध्ये प्रवेश घ्या,तुम्हाला लाखो रूपयांची बक्षीसे मिळतील अशा स्वरूपाचे आमिष पालकांना व विद्यार्थ्यांना दाखवित आहेत.यामुळे काही खाजगी शिकवणी वर्गाचे संचालक हे
पालक व विद्यार्थ्यांची प्रवेशावेळी दिशाभूल प्रसंगी फसवणूक, पिळवणूक करीत आहेत.तेंव्हा या सर्व बाबींवर शासनाचे नियंत्रण प्रस्थापित व्हावे आणि विद्यार्थी व पालकांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात असे निवेदनात म्हटले आहे.तर या विषयांवर बोलताना या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी याबाबत भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत आचार्य यांनी वारंवार निवेदने देवून पाठपुरावा केला आहे. परंतु,याबाबत कोणती ही कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त करून या प्रश्नी आता भिम आर्मीच्या (भारत एकता मिशन) वतीने
जनआंदोलन उभारणार असल्याचे आचार्य यांनी यावेळी बोलताना सांगितले.