बीड:आठवडा विशेष टीम―दि. २९ एप्रिल रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांनी ऊसतोड कामगारांना जिल्हा परिषद कडुन मोफत किराणा किट मिळण्याची घोषणा करत १ कोटी ४३ लाख रू निधि ग्रामविकास विभागाने विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यता दिली आहे.परंतु वास्तविक आज दि.४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सूद्धा ऊसतोड मजुरांना मोफत किट दुरच साधं सरपंच, ग्रामसेवक, तलाठी भेटायला सुद्धा आले नसल्याचे घारगांव येथिल ऊसतोड मजुरांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना व्यथा बोलून दाखवली.
मीना सुभाष माळी , ऊसतोड मजूर
आम्हा ऊसतोड मजुरांची दखल कोणी घेत नाही, गावाच्या बाहेर रहा एवढंच म्हणतात. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी कूणीही भेटायला आले नाहीत. पालकमंत्री मुंडे साहेबांनी ऊसतोड मजुरांना मोफत किराणा सामान देण्याची घोषणा करूनही ६ दिवस उलटले परंतु आम्हाला फुकटात सामान सोडुनच दर्या भेटायला सुद्धा कुणी आलं नाही.
सुशिला हरिदास गव्हाणे , ऊसतोड मजूर
आमचे लेकरं बिस्कीट पुड्यासाठी तरसलेत,रडतेय , आमच्या पैशाने सूद्धा कोणी आणुन द्यायला नाही.आम्ही सगळेच ऊसतोडण्यासाठी साखर कारखान्यावर जातोय. आमचं गणगोत इथं नाही,आम्ही काय खायचं,उपाशी मरायचं का ???
आरती बाबु माळी ,ऊसतोड मजूर
आमची पिण्याच्या पाण्याची सोय नाही,हे वालवाटे निघणारे पाणी प्यायला , सांडपाणी , तर जनावरांना पिण्यासाठी वापरावे लागते. साधी टंकरची सुद्धा सुविधा नाही, या घाण पाण्यामुळे माणसाबरोबर जनावरं सुद्धा बिमार होत्याल.त्यात या कोरोना महामारी मुळं पिण्याचे पाणी शूद्ध द्यायला पाहिजे.पण आमच्याकडं कुणीच लक्ष देत नाही…तुम्हीच काहीतरी बघा , कलेक्टर साहेबांना बोला आमची अडचण सांगा…
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड:
या ऊसतोड मजुरांची हेळसांड करणारे आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड ,मा.राहुलजी रेखावार साहेब, जिल्हाधिकारी बीड,. यांच्या आदेशाचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी. मा.राहुलजी रेखावार , जिल्हाधिकारी बीड आणि मा. अजितजी कुंभार साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड , मा.राधाकीसन पवार साहेब , जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री , कृषिमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी तक्रार ई-मेल व्दारे केली आहे.