सोयगाव,दि.४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर रेड झोन घोषित झालेल्या औरंगाबादवरून ये-जा करणाऱ्या तब्बल २५ ते ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी सोयगावला शासकीय कार्यालयात हजेरी लावली,मात्र रेड झोन मधून आलेल्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्याची तसदीही घेण्यात न आल्याने नागरिकांनी या ये-जा करणाऱ्या अधिकारी व कर्मचार्यांकडे शासकीय कामकाजासाठी मात्र सुरक्षितता म्हणून पाठ फिरविली होती.
कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या औरंगाबाद येथून सोयगावला पाच ते सहा शासकीय कार्यालयांच्या २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी औरंगाबादवरून सोयगाव गाठले,दरम्यान नुकताच जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना हॉटस्पॉट मधून ये-जा करण्यास मनाई केली आहे.तरीही सुट्या संपल्यावर या शासकीय कर्मचाऱ्यांनी सोयगाव गाठलेच त्यातच पुन्हा शासनाने सोमवार पासून शासकीय कार्यालयांची कर्मचाऱ्यांची हजेरी ३३ टक्क्यांवर केली असल्याने औरंगाबाद व्यतिरिक्त जळगाव जिल्ह्यातील पाचोरा बुलढाणा आदि भागातूनही घरी असलेल्या कर्मचाऱ्यांनी ३३ टक्क्यांमध्ये हजेरी लावून सोयगावला कर्तव्यावर रुजू झाले.जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या आदेशाचे उल्लंघन करून रेड झोन मधून ये-जा करणाऱ्या या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.यामध्ये तब्बल पाच ते सहा शासकीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून रेड झोन मधून सर्रास यांचे अप-डाऊन अद्यापही सुरूच आहे.