मुंबई दि.०१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शुक्रवार, दि. ०१ फेब्रुवारी रोजी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, कामगार, नोकरदार, मध्यवर्गीय अशा सर्व समाज घटकांना दिलासा देणारा आहे. हा अर्थसंकल्प ‘नवा भारत’ निर्माण करण्यासाठी सर्व वंचित, बहुजन, आर्थिक मागसलेल्या समाजाला शक्ती देणारा आहे. या अर्थसंकल्पावर सर्व स्तरातील जनता खूष आहे, त्यामुळेच काँग्रेस नाखूष आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी अर्थसंकल्पाच्या जल्लोष कार्यक्रमात व्यक्त केली. लोकाभिमुख अर्थसंकल्प हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केला त्यानिमित्ताने भाजपा प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
हा अर्थसंकल्प २०१९ पुरता मर्यादीत नसून २०३० मधील नव्या भारताला घडवण्यासाठी कटीबध्द असलेलला अर्थसंकल्प आहे. सर्व देशभर आनंदाचे वातावरण आहे. देशातील सर्व स्तरातून या अर्थसंकल्पाचे स्वागत होत आहे, असेही शेलार म्हणाले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे विधानसभेतील प्रतोद आमदार राज पुरोहित, नगरसेवक अतुल शहा, नगरसेवक आकाश पुरोहित, भाजपा प्रवक्ते अवधुत वाघ, संतोष पटेल हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवून फटाक्यांची आतषबाजी केली.