बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे चौसाळा येथिल गोरे इंग्लिश स्कूल शेजारी घारगांव रोडला वास्तव्य करीत असलेल्या
ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भटक्या विमुक्त जमातींच्या अथवा पालावर राहणा-या मुर्ति बनवणा-या अथवा भिक्षा मागून पोट भरणा-या गोरगरीबांची पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेबांनी जिल्हा प्रशासनाने ऊसतोड मजुरांसाठी दिलेल्या निधीतून जेवणाची सोय करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी मार्फत पालकमंत्री मा.धनंजयजी मुंडे यांना डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
सलमा शेख, मुर्तिकार:
आमचा मुर्ति बनवण्याचा व दारोदारी हिंडून विकण्याचा धंदा आहे, लाकडाऊन मुळे धंदा बंद आहे, लेकरांबाळांची उपासमार होत आहे, पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते .
रुखसाना ,मुर्तिकार:
पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते २ रु ला हंडाभर पाणी शेजारील बोअरवेल वरुन आणावे लागते. शौचालयासाठी उघड्यावर जावे लागते, १० दिवसांपूर्वी दोन वेळा सरपंच यांनी धान्य , भाजीपाला आणून दिले होते, परंतु ते म्हणतात, आम्ही किती दिवस देणार, सरकार जेवणासाठी निधी देत नाही,आम्ही जि.प.सदस्य अशोक लोढा अध्यक्ष असलेल्या सामाजिक संस्थेतर्फे खर्च करत आहोत.
भिक्षा मागणारे :
आमचा धंदा दारोदारी हिंडून भिक्षा मागून पोट भरण्याचा आहे, संचारबंदी लागू झाल्यामुळे दारोदारी फिरायची बंदी आहे, कोरोना महामारी मुळे लोकं भिक्षा देण्यासाठी सूद्धा जवळ येत नाहीत.आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.सरकारने आमच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड:
पालकमंत्री मा.धनंजयजी मुंडे यांनी ज्या प्रमाणे ऊसतोड मजुरांची मोफत किराणा किट देण्याची ग्रामविकास विभागामार्फत निधी मंजूर केला तर याच निधितून ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीतील पालावरील लोकांना पिण्याचे पाणी, शौचालय आणि जेवणाची सोय करण्यात यावी, अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री , अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेल व्दारे केलेली आहे.