औरंगाबाद: ६ स्वस्त धान्य दुकाने निलंबित , १७ दुकानदारांना निलंबनाची नोटीस

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― लॉकडाऊनच्या काळात गरीब व गरजू धान्यापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. जिल्हा पुरवठा विभागामार्फत योग्य नियोजन आणि समन्वयाच्या माध्यमातून गावखेड्यांपर्यंत धान्य पोहचविल्या जात आहे. अन्नधान्यापासून गरीब व गरजू वंचित राहू नये म्हणून सामाजिक संस्था देखील हिरीरीने सहभाग घेत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत एकूण 1802 स्वस्त धान्य दुकाने असून, त्यापैकी औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 199 तर ग्रामीण भागांमध्ये 1603 स्वस्त धान्य दुकाने आहेत. याअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजना, अंत्योदय अन्न योजना आणि एपीएल शेतकरी (केशरी) योजनेच्या लाभार्थ्यांना नियमितपणे प्रतिव्यक्ती 05 किलो धान्य दिले जाते. यामध्ये 03 किलो गहू 2 रुपये दराने तर 02 किलो तांदूळ 03 रुपये प्रति किलो या दराने दिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 05 किलो केंद्र शासनाचा मोफत तांदूळ दिलेला आहे. एप्रिल महिन्याचे नियतन आणि केंद्र शासनाचा मोफत तांदूळ औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पात्र कार्डधारकांना वितरित करण्यात आलेला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता यावी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचे अन्नधान्य पोहोचावेत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानावर एका शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, शिक्षक यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी श्री चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांना असे निर्देश दिले आहेत की सर्व पात्र कार्डधारकांना शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीतच धान्याचे वितरण करावे. धान्य शासनाने ठरवून दिलेल्या दरा नुसार आणि लाभार्थींना देय असलेले सर्व धान्य द्यावे, लाभार्थ्यांना पावती द्यावी पात्र कार्डधारकांच्या आणि लाभार्थ्यांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदार, औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पुरवठा निरिक्षक यांचे भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 06 स्वस्त धान्य दुकाने निलंबित करण्यात आले असून 17 स्वस्त धान्य दुकानदारांना निलंबनाची नोटीस देण्यात आलेली आहे. निलंबित करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये किरण जगधने लोहगाव पैठण, मुक्तद्वार ग्राहक संस्था, गुलमंडी, औरंगाबाद शहर, आर.बी. रेशवाल, संघर्षनगर, औरंगाबाद शहर, चेअरमन दाक्षायणी ह. संस्था, बाभुळगांव (नांगरे), तालुका गंगापूर, श्रीमती आशाबाई संतोष गवळी, लिंबेजळगाव तालुका गंगापूर व श्री. अंबादास येडूबा खरात, कायगाव तालुका सिल्लोड या स्वस्त धान्य दुकानांचा समावेश आहे.

माहे मे आणि जून महिन्यासाठी शासनाने जे लाभार्थी प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी नाहीत आणि ज्यांना नियमितपणे अन्नधान्य मिळत नाही अशा केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दराने प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य याप्रमाणे गहू तीन किलो व तांदूळ दोन किलो गहू आठ रुपये दराने आणि तांदूळ बारा रुपये दराने वितरित करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. हे वितरण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक 28 एप्रिल पासून सर्व केशरी कार्डधारकांना अन्नधान्याचे वितरण सुरू झाले आहे.
बिगर कार्डधारकांना शासनाकडून कुठलेही प्रकारचे धान्य प्राप्त झालेले नाही तथापि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर आजपर्यंत 76 सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून 2 लाख 62 हजार 192 फुड पॅकेट्स तर 1 लाख 44हजार 812 लोकांना जेवण दिले आहे तसेच 1 लाख 12 हजार 871 किराणा किटचे वितरण सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. तसेच भारतीय अन्न महामंडळाकडून ओ.एम.एस.एस. या दराने गहू प्रति क्विंटल 2100 रुपये आणि तांदूळ प्रति क्विंटल 2200 रुपये या दराने विविध सामाजिक संस्थांनी भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदळाची खरेदी केली असून ती गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेली आहे. यामध्ये दुवा फाउंडेशन औरंगाबाद, मातृभूमी प्रतिष्ठान, प्रबोधन गोरेगाव मुंबई, डॉ. वेणू प्रकाश चॅरिटेबल सोसायटी, औरंगाबाद यांचा समावेश आहे. लॉकडाऊननंतर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेचा व महानगरपालिका यांचा समन्वय ठेवून स्थलांतरित मजूर आणि कामगार वर्गासाठी जिल्ह्यामध्ये एकूण 45 कॅम्प तयार करण्यात आले असून आतापर्यंत 9542 लोकांना नियमितपणे सकाळचा नाश्ता चहा आणि दुपारचे आणि रात्रीचे जेवण पुरविण्यात आलेले आहे.


Previous post #CoronaVirus अहमदनगर: जामखेड हॉटस्पॉट केंद्र जाहीर ,प्रतिबंधाची मुदत आता १० मे पर्यंत वाढवली
Next post होम क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर मोफत किराणा कीट वाटणार की ग्रामपंचायतची भरती करणार ? ऊसतोड मजुरांचा सवाल ! – डॉ ढवळे