कार्यक्रमबीड जिल्हामहाराष्ट्र राज्यसामाजिक

ना. पंकजाताई मुंडे झाल्या निराधारांच्या 'श्रावणबाळ'

परळीतील भव्य मेळाव्यात अडीच हजार लाभार्थ्यांना केले अनुदानाचे वाटप

निराधारांना वा-यावर सोडणार नाही; प्रत्येकांना लाभ देणारच - ना. पंकजाताई मुंडे

परळी दि. ०२ :राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे हया आज समाजातील निराधार घटकांच्या ख-या 'श्रावणबाळ' बनल्या. आज त्यांच्या हस्ते शहरात झालेल्या भव्य मेळाव्यात अडीच हजार लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतंर्गत अनुदानाचे वाटप करण्यात आले. समाजातील निराधार व्यक्तीला वा-यावर सोडणार नाही, प्रत्येकांना शासनाचा लाभ मिळवून देणारच असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने अक्षता मंगल कार्यालयात पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निराधार व दिव्यांगाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. तहसीलदार शरद झाडके, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे, श्रीहरी मुंडे, श्रीराम मुंडे, पं. स. सदस्य मोहन आचार्य, भास्कर फड आदी यावेळी उपस्थित होते.

समाजात आज अनेक जण निराधार आहेत. ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले त्यांना घराबाहेर काढले जाते, त्याची जाणीव तरूणांना नाही, अशा निराधारांना आधार देण्याचे काम आम्ही करत आहोत. काळजी करू नका, तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी तुमची ही लेक घेईल असा विश्वास ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी दिला. मी आमदार असताना ११ हजार लाभार्थी होते आता ती संख्या १४ हजारावर गेली आहे. आज अडीच हजार लोकांना लाभाचे वाटप केले आहे, ज्यांचे राहिले आहेत ते उर्वरित प्रस्तावही लवकरच मंजूर होतील असे त्या म्हणाल्या. निराधारांचे प्रस्ताव मंजूर करतांना ढिलाई चालणार नाही. कागदपत्रांची पुर्तता करून तातडीने मंजूरी द्यावी असे सांगून निराधारांना लाभ पोहोचविण्याचे चांगले काम केल्याबद्दल निराधार समितीच्या टीमचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी व असंघटित कामगारांना पेन्शन लागू केली आहे, हे सरकार गरीबांचा विचार करणारे आहे. भविष्यात असेच काम आमच्या हातून व्हावे यासाठी तुमचे आशीर्वाद मला व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांना द्या असे सांगून येत्या २२ तारखेला होणा-या सामुदायिक विवाह सोहळ्यात गोरगरीब पालकांच्या उपवर मुला मुलींच्या लग्नाची जबाबदारी मी घेतली आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

तुम्ही जन्माची भाकर दिली

ना. पंकजाताई मुंडे यांच्या भाषणाने उपस्थित लाभार्थी भारावून गेले. सत्तेच्या माध्यमातून केलेल्या कामाविषयी त्यांनी लाभार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. एका निराधार महिलेने तर त्यांचे भाषण मध्येच थांबवून 'तुम्ही आम्हाला जन्माची भाकर दिली, आमचे आशीर्वाद तुमच्या पाठिशी सदैव राहतील ' अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित सर्व वयोवृद्ध नागरिकांनी हात उंचावून त्यांना आशीर्वाद दिले. संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सुधाकर पौळ, सदस्य सुशीला फड, हनुमंत नागरगोजे, विजय दहिवाळ, दीपक जगतकर, अशोक आघाव, बालासाहेब गुट्टे यांनी ना. पंकजाताई मुंडे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. अरूण पाठक, संचलन संजय सुरवसे यांनी केले तर गोविंद मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.