परळी दि. ०३ :श्रीमज्जगदगुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी यांचे आज परळीत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी उत्स्फूर्त स्वागत केले, त्यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या शोभायात्रेतही त्या सहभागी झाल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
देशातील चार मुख्य पिठांपैकी श्रुंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती महास्वामी हे भारत विजयी यात्रेनिमित्त हिंदू धर्माच्या प्रसार आणि प्रचारासाठी तीन दिवस जिल्हयात आहेत. प्रभू वैद्यनाथाला वेदोक्त शास्त्रोक्त अभिषेक करण्यासाठी आज ते परळीत आले होते. सकाळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिराच्या आवारात त्यांचे आगमन झाले. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी याठिकाणी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तेथून वैद्यनाथ मंदिरापर्यंत निघालेल्या शोभायात्रेत त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी शहरातील नागरिक व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.