निसर्गरम्य परिसरातील अंधारेश्वर मंदिराचे रूप पालटले ; पंकजा मुंडे यांनी मंजूर केलेल्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून झाले काम

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―
परळी पासून जवळच डोंगरांच्या कुशीमध्ये असलेल्या निसर्गरम्य अशा अंधारेश्वर मंदिराच्या समोरील सभागृहाचे काम, सुशोभीकरण, रंगरंगोटी आदी पूर्ण झाले असून तत्कालीन पालकमंत्री नामदार पंकजा मुंडे यांनी मंजूर करून दिलेल्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून हे काम करण्यात आले आहे. यामुळे अंधारेश्वर मंदिराचे रूप पालटून गेले आहे.
तालुक्यातील मालेवाडी दत्तवाडी ग्रामपंचायत अंतर्गत जाज्वल्य असे अंधारेश्वराचे जुने पुरातन मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात व डोंगराच्या एकदम कुशी मध्ये आहे. परळीपासून अगदी जवळच असलेले हे ठिकाण अतिशय रम्य असून अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अंधारेश्वराच्या दर्शनासाठी परळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणावर जातात. अंधारेश्वर मंदिर परिसर हा अतिशय निसर्गरम्य असून चांगला पर्यटनाचा आनंद या ठिकाणी मिळतो. त्याचबरोबर भाविकांना अंधारेश्वराच्या दर्शनाचाही लाभ होतो. मालेवाडी व दत्तवाडी या दोन गावांच्या काही अंतरावर मधोमध एकांतात असलेले हे ठिकाण अनेक भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे. याठिकाणी तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सन अठरा-एकोणीस मध्ये तीर्थक्षेत्र विकास निधी मंजूर करून दिला होता. या निधीतून मंदिर व सामाजिक सभागृहाच्या कामाला प्रारंभ झाला. हे काम आता पूर्ण झाले असून रंगरंगोटी ही झालेली आहे. त्यामुळे या मंदिराला नवे देखणे रूप मिळाले आहे. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे तीर्थक्षेत्र निधीतून साकारलेले मंदिर अधिकच आकर्षक बनले आहे. या मंदिरासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून निधी मंजूर करून दिल्याबद्दल मालेवाडी चे सरपंच सौ.वैशाली भुराज बदने, मालेवाडी दत्तवाडी येथील गावकरी व भाविकांनी आभार व्यक्त केले आहेत.