अहमदनगर: संगमनेर शहर, कुरण गाव आणि मौजे धांदरफळ बु. येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना ; संपूर्ण क्षेत्र २३ मे पर्यंत हॉटस्पॉट पॉकेट जाहीर

अहमदनगर, दि.०९:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून संगमनेर शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्‍हणुन व सदरच्‍या क्षेत्राच्‍या मध्‍यबिंदु पासुन जवळपास ०२ कि.मी.चा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित करण्यात आला असून यापूर्वी हॉटस्पॉट पॉकेट म्‍हणून घोषित केलेल्‍या कुरण गाव (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) या क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री इत्‍यादी दिनांक १० मे रोजी सकाळी ०६ वाजेपासून ते दि.२३ मे, २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्‍थान तसेच सदर क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.

यापूर्वी, संगमनेर शहरातील काही भाग आणि कुरण गाव आणि धांदरफळ बु. येथे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. आज पुन्हा संपूर्ण संगमनेर शहर आणि या दोन्ही गावात प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून हॉटस्पॉट पॉकेट जाहीर करण्यात आले आहे.

यापूर्वी, संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा, रेहमत नगर, जमजम कॉलनी, भारत नगर, अलका नगर, कोल्‍हेवाडी रस्‍ता, वाबळे वस्‍ती, उम्‍मद नगर, एकता नगर, शिंदे नगर, ईस्‍लामपुरा, कुरण रोड, बीलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्‍ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर तसेच कुरण गाव (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट जाहीर करण्यात आले होते. संगमनेर शहर व परिसरामध्‍ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याकामी या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी करण्‍यासाठी स्‍थानिक प्रशासनाने खालील प्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार,

1. सार्वजनिक ध्वनिक्षेपक द्वारे या आदेशाची माहिती देण्यात यावी.
2. कंट्रोल रुम स्‍थापन करुन 24 x 7 कार्यरत ठेवावी. सदर ठिकाणी 3 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्‍यात येवून प्रत्‍येक शिफ्टमध्‍ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्‍द करण्‍यात यावेत.
3. कंट्रोल रुम मध्‍ये रजिस्‍टर ठेवून त्‍यामध्‍ये नोंदी घेण्‍यात याव्‍यात व नागरीकांना आवश्‍यक त्‍या जिवनावश्‍यक वस्‍तु सशुल्‍क पु‍रविण्‍यात याव्‍यात. तसेच प्राप्‍त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्‍यात यावे.
4. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्‍यक असणा-या बाबी जसे दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्‍यादी बाबी योग्‍य ते शुल्‍क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्‍यात याव्‍यात. त्‍याकामी जिवनावश्‍यक वस्‍तुंचे व्‍हेंडर निश्चित करुन, पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्‍यादी बाबींचे सुक्ष्‍म नियोजन करावे.
5. संगमनेर शहर तसेच कुरण गाव (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, संगमनेर हे सनियंत्रण अधिकारी म्‍हणून कामकाज पाहतील.
6. या क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकींग सुविधा बँक प्रतिनिधी मार्फत उपलब्‍ध करुन द्याव्‍यात.
7. पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्‍ते बंद करुन एकच रस्‍ता बॅरिकेडस द्वारे खुला ठेवावा.
8. सदर क्षेत्रामध्‍ये सेवा देणा-या सर्व शासकीय कर्मचारी यांना संबंधीत सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत.
9. वर नमुद प्रतिबंधीत भागामध्‍ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्‍याचे निदर्शनास आल्‍याने येथील नागरीकांच्‍या हालचालींवर निर्बंध आणने आवश्‍यक ठरले आहे. त्‍यामुळे सदर भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्‍थापनांकडून देण्‍यात आलेल्‍या वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द करण्‍यात येत आहे.
10. वर नमुद क्षेत्रातील इतरत्र कर्तव्‍यार्थ असलेल्‍या व्‍यक्‍तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्‍याच्‍या ठिकाणी जाणे आवश्‍यक असल्‍यास, अश्‍या व्‍यक्‍तींची त्‍यांच्‍या कर्तव्‍याच्‍या ठिकाणी वास्‍तव्‍याची सुविधा संबंधीत आस्‍थापनांनी उपलब्‍ध करुन दयावी. जेणेकरुन कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील त्‍यांच्‍या हालचालींवर निर्बध घालणे शक्‍य होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Previous post अहमदनगर: धांदरफळ येथील आणखी एक व्यक्ती कोरोना बाधित ; जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५३
Next post #CoronaVirus आज रविवारी 'या' वेळेत राहणार जालन्यात संचारबंदी