पिंपळे गुरव:आठवडा विशेष टीम― औंध रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांनी गर्दी करून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवल्याचे दिसून येते. औंध जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याच ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात असणाऱ्या जिल्ह्यातील व परराज्यातील नागरिकांना परगावी जाण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जवळ असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कोरोना जनजागृति साठी मोहीम राबवत आहेत, घरी थांबा असे आवाहन करण्यात येत आहे. मागील एक ते दीड महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन पाळलेल्या नागरिकांवर या गर्दीमुळे अन्याय तर होणार नाही ना असा संभ्रम निर्माण होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात बाहेर गावी अडकलेल्यांना आपल्या गावी जाण्यासाठी व बाहेरून आपल्या लोकांना परत आणण्यासाठी उपविभागीय कार्यालयातून प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या प्रमाणपत्रांसाठी वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्याकरिता परगावी जाण्यासाठी नागरिकांनी औंध जिल्हा रुग्णालयात कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन न करता तसेच फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता मोठी गर्दी करण्यात आली होती. प्रशासन या गर्दीला आवर घालण्यास तोकडे पडत आहे. या ठिकाणी प्रशासनाने अधिक कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्याची आवश्यकता आहे.
नागरिक प्रशासकीय परवानगीसाठी प्रयत्न करीत आहेत. बाहेर गावी जाण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र मिळविणे गरजेचे आहे.
त्यामुळे सदर नागरिक प्रशासकीय परवानगीसाठी धडपड करीत आहेत. परंतु वायसीएम रुग्णालयात आणि नवीन भोसरी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याने वैद्यकीय प्रमाणपत्रा करिता नागरिकांनी या ठिकाणी गर्दी न करता सहकार्य करावेे असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच औंध जिल्हा रुग्णालयातही कोरोनाचे रुग्ण असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये. या ठिकाणी प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून आले.