सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारचे धोरण― कृषिमंत्री दादाजी भुसे

अहमदनगर:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्यात विविध भौगोलीक विभागात विपुल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध आहे. या नैसर्गिकपणे उपलब्ध असणाऱ्या कृषि मालाचे ब्रॅण्डिंग
करुन तो शहरातील ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्यास शेतकरी बाधवांचा आर्थिक स्तर उंचविण्यात मदत होईल. राज्य शासन बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना आणत आहे, या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सक्षम बनविणार आहोत. गटशेती तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार आहोत, असे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात जागतिक बँक अर्थसहाय्यीत, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्राद्वारे सेंद्रिय शेती निविष्ठा वापर, उत्पादन, प्रमाणीकरण आणि विपणन व्यवस्था या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्याचा समारोप श्री. भुसे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.
अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा उपस्थित होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, नियंत्रक श्री. विजय कोते, प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार, सह प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे आणि आयोजन सचिव डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.

यावेळी, श्री.भुसे म्हणाले, शेतकरी उत्पादन घेतो पण ते विकणे अवघड जाते. या लॉकडाऊन स्थितीमध्ये काही शेतकऱ्यांनी स्वतः शेती उत्पादन विक्रीचे प्रयोग केले व ते यशस्वी झाले. याच उत्पादनाला ब्रॅण्डिंगची जोड दिली तर नक्कीच शेतीमालाला जास्त दर मिळतील. सेंद्रिय शेती मालाचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न राज्य शाशन करणार आहे. सेंद्रिय शेतीचे धोरण ठरवतांना शेतकर्यांनी मांडलेल्या सुचनांचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यामध्ये एकुण 1585 शेतकरी गट असून त्यामध्ये सुमारे 65000 शेतकरी जोडले गेले आहेत. सध्या राज्यात 35000 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जात आहे. या गटांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देवून बळकटीकरण केले जाईल. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करुन ज्ञानदानाचे काम केले याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. या परिस्थितीत मनुष्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सेंद्रिय कृषि माल सेवन करणे उपयुक्त ठरेल. त्यामुळे सेंद्रिय शेतीला भविष्य काळात मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास श्री. भुसे यांनी व्यक्त केला.

कुलगुरु डॉ. विश्वनाथा म्हणाले की कोरोनाच्या या लॉकडाऊन कालावधीमध्ये कृषि विद्यापीठाने 22 ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम शेतकरी, विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसाठी आयोजीत केले असून अशा प्रकारचा उपक्रम देशामध्ये प्रथमच होत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात सेंद्रिय शेतीवर संशोधन सुरु आहे. रासायनिक खते व किटकनाशकांच्या असमतोल वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत असून मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभुमीवर येत्या काळात सेंद्रिय शेतीला अधिक महत्व प्राप्त होणार आहे.

अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. कास्ट-कासम प्रकल्पाबाबत माहिती या प्रशिक्षणाचे निमंत्रक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा आयोजक सचिव डॉ. उल्हास सुर्वे यांनी सादर केला. यावेळी डॉ. किरण कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद शिंदे यांनी तर आभार संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी मानले.

याप्रसंगी प्रगतशील शेतकरी व तज्ञ कृषिरत्न श्री. विश्वासराव पाटील, श्री. अनिल देशमुख, श्री. प्रशांत नाईकवाडी, श्री. वैभव चव्हाण, सौ. रेवती जाधव, सौ. मोनिका मोहिते, श्री. विवेक माने, श्री. उत्तम धिवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रशिक्षणाला राज्यातून सुमारे 1000 शेतकर्यांनी सहभाग नोंदवला. या एक आठवड्याच्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात 5 प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत ऑनलाईन प्रशस्तीपत्रकाचे वाटप करण्यात आले. या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून डॉ. शभांगी घाडगे, डॉ. सेवक ढेंगे, श्री. हेमंत जगताप, इजी. मोहसीन तांबोळी यांनी काम पाहिले. कृषिमंत्री श्री. भुसे यांचा शेतकऱ्यांसोबतचा संवाद महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच युट्युब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post #CoronaVirus अहमदनगर शहरातील दोघांना कोरोनाची लागण
Next post मसेवाडी येथिल मोरे वस्तिला पाणी टंचाई तहसिलदाराचीच कृपा , पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती, टँकरची मागणी, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार ―डॉ.गणेश ढवळे