धुळे:आठवडा विशेष टीम―धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात चिंचवारकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्यालगत डोंगर भागात काल (दि.१७) च्या भल्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास हिंसा बिबट्याने गायीच्या वासराचा फडशा पाडला. या घटनेनंतर बिबट्याची परिसरात दहशत निर्माण होऊन शेतकऱ्यांसह ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. तोंडाला रक्त लागलेल्या बिबट्याने परिसरात धुमाकूळ घालण्याअगोदर संबंधित वन विभागाने त्वरेने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा; अशी एकमुखी मागणी केली जात आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, निकुंभे शिवारातील गट नं.१३१/१ मधील शेतकरी चैत्राम पाटील यांच्या मालकीच्या शेतात दुधाळ गाय व तिचे वासरु नेहमीप्रमाणे बांधले होते. काल दि. १७ मे रविवार, रोजी भल्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास हिंस्त्र बिबट्याने शेतात प्रवेश करुन गायीच्या वासरावर हल्ला चढविला. हल्ल्यात चवताळलेल्या बिबट्याने वासराच्या मानेचे लचके तोडत फडशाच पाडला. शेतमालक चैत्राम पाटील यांचा मुलगा प्रशांत पहाटे साडेपाच वाजता गायीचे दूध काढण्यासाठी आला तेव्हा हल्ल्याची ही घटना व मरुन पडलेले गायीचे वासरु त्याच्या निदर्शनात आले. याबाबत प्रशांत पाटील यांनी सांगितले की, बिबट्यांनी आतापर्यंत अनेक वेळा परिसरातील बुरझड, बोरीस, मेरगाव आदी भागात असे हल्ले केलेले आहेत. त्यामध्ये कितीतरी निरपराध पशू ठार झाले आहेत. या संदर्भात संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटून लेखी निवेदने ही दिली आहेत. परंतु बिबट्या अद्याप वन विभागाच्या हाती लागलेला नाही. चाणाक्ष बिबट्या चकमा देत, वारंवार जागा बदल करत, छुप्या पध्दतीने परिसरात वेगवेगळ्या भागात हल्ले करुन दहशत पसरवित आहे. संबंधित बोरीस ग्राम पंचायतीने सुध्दा याबाबत वन विभागास लेखी निवेदन दिले आहे. हिंस्त्र बिबट्यापासून परिसरात पशृंबरोबरच मानवी जीविताला मोठा धोका निर्माण बिबट्याने वासराचा फडशाबाबत वन अधिकारी यांना कळविण्यात आले असून, मृत वासराचा पंचनामा आदी प्रशासकीय कामकाज उशिरापर्यंत सुरुच होते. वन विभागाने एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.