यवतमाळ : ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ पुन्हा दोन जणांना सुट्टी ; दोन जण नव्याने पॉझेटिव्ह, आकडा सात वर

यवतमाळ, दि.१८:आठवडा विशेष टीम― गत आठवड्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 98 वरून 7 वर आला. यापैकी आता पुन्हा दोन जण बरे झाले असून त्यांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ ही संख्या पाच वर आली असतांनाच यात आणखी दोन नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची आज भर पडली. त्यामुळे पुन्हा ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या सातवर आली आहे.
गत आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील 91 आणि आज (दि.18) दोन रुग्ण असे एकूण 93 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. मात्र आज पुसद आणि दारव्हा येथील दोन जणांचे रिपोर्ट नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. हे दोन्ही व्यक्ती मुंबईवरून यवतमाळ जिल्ह्यात आले होते. त्यामुळे त्यांना संस्थात्मक विलगीकरणांतर्गत कोव्हिड केअर सेंटर येथे भरती करण्यात आले. त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविले असता त्यांचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला. जिल्ह्यात आतापर्यंत 1687 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
लॉकडाऊनच्या चवथ्या टप्प्याला आजपासून सुरवात झाली आहे. नागरिकांनी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी करण्यात प्रशासनाला आतापर्यंत जे सहकार्य केले, तसेच सहकार्य या टप्प्यातही करावे. नागरिकांच्या सहकार्यानेच कोरोना विरुध्दची लढाई जिंकण्यात यश येईल. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळावी. बाहेर निघतांना मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.