बीड: पाटोदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव ,वडवणीतही पॉझिटीव्ह ,जिल्ह्यात आज ४ अहवाल पॉझिटिव्ह

पाटोदा तालुक्यात ३ , वडवणी १

बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातून बुधवारी (दि.२०) एकूण ११३ संशयितांचे स्वॅब‌ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी चौघांचे अहवाल ‌पाॅझिटीव्ह‌ आले असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या चार कोरोनाग्रस्तांपैकी तीन पाटोदा तालुक्यातील असून एक वडवणीचा आहे. हे सर्वजण मुंबईहून बीड जिल्ह्यात आलेले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याशेजारी असलेल्या पाटोदा (जि.बीड) तालुक्यातील खुद्द पाटोदा शहरातील ७३ वर्षीय वृद्ध कोरोनाबाधित झाला आहे. तर, वाहली (ता. पाटोदा) येथील दोन महिलांनाही (वय ६० आणि २७ वर्ष) कोरोनाची लागण झाली. वडवणी येथील ६७ वर्षीय वृद्धाचा अहवाल देखील पाॅझिटीव्ह‌ आला असल्याचे निष्पन्न झाले आहे. बुधवारी एकूण ११३ स्वॅब‌ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी चार पाॅझिटीव्ह‌, ९० निगेटिव्ह आले आहेत तर, १९ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

दरम्यान, बीड, माजलगाव, गेवराई, केज आष्टी पाठोपाठ कोरोनाने पाटोदा आणि वडवणी तालुक्यातही हातपाय पसरल्याने दिवसेंदिवस जिल्ह्याला कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. कालपर्यंतच्या १२ रुग्णांसह आता बीड जिल्ह्यात एकूण १६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.