बेनसुर (ता.पाटोदा) पाणीपुरवठा योजनाच नाही, सरकार म्हणतंय हात धुवा, पाणीच नाही कुठुन हात धुवायचा ,महिलांचा संतप्त सवाल ―डॉ.गणेश ढवळे

पाटोदा:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यातील जास्त स्वातंत्रसैनिक असणाऱ्या गावापैकी स्वातंत्रसैनिक हुतात्मा देवराव आर्सुळ यांचे पाटोदा तालुक्यातील मौजे बेनसूर हे एक गाव , महाराष्ट्रातील एकमेव गाव ज्यांची लोकसंख्या १५०० असुनही गावात ग्रामिण पाणीपुरवठा योजनाच नाही, विशेष म्हणजे ग्रुपग्रामपंचायत असणाऱ्या बेनसूर अंतर्गत रामवाडी ,घाटवाडी यांची लोकसंख्या ४०० असताना त्यांना पाणीपुरवठा योजना आहे, परंतु मुख्य बेनसुर गावाला नाही. हातपंप बंद पडले आहेत, महिलांना खाजगी बोअरवेल वरुन विनंती करून पाणी आण्ण्यातच दिवस जातो.

त्रिवेणी बाळु आर्सुळ-

आम्हाला पाण्याची फारच अडचण आहे, लांबुन आणावे लागते शेजा-याच्या खाजगी मालकीच्या बोअरवेल वरुन आणावं लागतं, भांडे धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी सांडपाणी नाही,आम्हाला नळयोजना हवी.

लक्ष्मी आर्सुळ-

आम्हाला पाणीच नाही, कुठुनबी आणावं लागतं, शासन म्हणतंय कोरोना महामारी मुळे सारखं हात धुवा ,पाणीच नाही तर कुठुन हात धुवायचा , खाजगी बोअरवेल वरून पाणी आणावं लागतं, लोक येऊन देत नाहीत, पाणी आण्यातच दिवस जातो, आम्हाला घरोघरी नळजोडणी हवी.

जिवन माधव आर्सुळ-

बिल्कुल पाण्याची व्यवस्था नाही,हात धुवायला सुद्धा पाणी नाही,आम्हाला बांगरवाडा तलावावरून पाणीपुरवठा योजना पाहिजे.टंकर आणले तर आडात नाहीतर विहीरीत सोडतेत,ते पाणी शेंदायची आमच्या सारख्या म्हता-या माणसांची सोय नाही.

सुशिला परसराम आर्सुळ ,सरपंच-

मी सरपंच पदाचा कार्यभार २ महिन्यांपूर्वी स्विकारला आहे, गावाला पाणी पुरवठा योजना नाही ही खरी गोष्ट आहे मात्र आ.सुरेश आण्णा धस यांच्या मार्फत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. टँकरचा प्रस्ताव सादर केला आहे, दोन दिवसांत मंजूर होऊन गावात टँकर व्दारे पाणीपुरवठा केला जाईल तसेच गावातील ४ खाजगी बोअरवेल अधिग्रहण केलेले आहेत.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते ,लिंबागणेश

भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी ग्रामिण पाणीपुरवठा योजना तात्काळ मंजूर करून त्यासाठी निधि वितरीत करण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबराव पाटील , ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड मा. धनंजय मुंडे आणि आ.बाळासाहेब आजबे आणि आ.सुरेश धस यांना ई-मेलद्वारे निवेदन सादर केले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.