नगर : लवकरच जिल्हा रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅब कार्यान्वित पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली लॅबला भेट

अहमदनगर, दि. २१:आठवडा विशेष टीम―येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्ज अशी कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा (कोविड-१९ अर्थात कोरोना टेस्टलॅब) उभारण्यात आली असून लवकरच ती कार्यान्वित होणार आहे. चाचणी स्वरुपात आज येथे सुरुवात झाली असून इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अधिकृत मान्यतेनंतर कोरोना संदर्भातील चाचण्यांना सुरुवात होणार आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रयोगशाळेला भेट देऊन सद्य:स्थितीची माहिती घेतली आणि पाहणी केली. या कोरोना चाचणी लॅबमुळे जिल्ह्यातील कोरोना आजाराची लक्षणे असणार्‍या व्यक्तींची चाचणी लवकर करणे सोपे होईल आणि प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह या कोरोना टेस्ट लॅबला भेट दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे आदी उपस्थित होते.
दैनंदिन स्वरुपात याठिकाणी किती चाचण्या होणार, येथील तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक आदींबाबत त्यांनी माहिती घेतली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने अतिशय पाठपुरावा करुन कमी कालावधीत ही लॅब उभारणी केली आहे. आयसीएमआर निश्चितपणे लवकरच याठिकाणी चाचण्यांना परवानगी देईल, असे त्यांनी नमूद केले.
सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील रुग्णांच्या कोरोनासंदर्भातील चाचण्या सुरुवातीला पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा (एनआयव्ही) आणि नंतर लष्करी वैद्यकीय महाविद्यालय येथे केल्या जात आहेत. येथे जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेली लॅब आयसीएमआरने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तयार करण्यात आल्याने त्यास लवकरच चाचण्यांसाठी मान्यता मिळेल. प्रत्येक शिफ्टमध्ये शंभर चाचण्या याप्रमाणे २४ तासांत ३०० चाचण्या करण्याची क्षमता या लॅबची असेल, अशी माहिती त्यांनी दिली.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.