अहमदनगर दि.२५:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या ०५ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. याशिवाय, दोन रुग्णांचे रिपीट अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पारनेर तालुक्यातील म्हसने फाटा येथील 31 वर्षीय पुरुष, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 33 वर्षीय पुरुष, अकोले तालुक्यातील ढोकरी येथील 35 वर्षीय पुरुष, नगर तालुक्यातील वाकोडी येथील 43 वर्षीय पुरुष आणि निंबळक येथील तीस वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. मात्र, या व्यक्ती मुंबईहून आपल्या जिल्ह्यात आल्या होत्या. त्यांची येथील प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्या व्यक्ती बाधीत आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
याशिवाय सुभेदार गल्ली येथील कोरोना बाधित व्यक्तीचा दहा दिवसानंतरचा स्त्राव चाचणी अहवालही पॉझिटिव आला आहे. घाटकोपर येथून लिंगदेव (अकोले) येथे आलेल्या एका व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयाने त्याची पुन्हा येथे चाचणी केली असता तो बाधित असल्याचे आढळून आले आहे.