सोयगाव,दि.२५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोविड-१९ च्या लॉकडाऊनमधून शेती कामांसाठी मिळालेल्या सूट नंतर अचानक सोमवारी सोयगावचा पारा ४६ अंशावर गेल्याने कोरोना पाठोपाठ उन्हाच्या धास्तीने पुन्हा सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली होती.उन्हाच्या झळांचा शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्यात आला होता.उन्हाच्या तीव्रतेने सोमवारी सोयगाव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले,मात्र शेती शिवारातही शुकशुकाट दिसून आला होता.त्यामुळे पूर्वहंगामी मशागतीला कोविड-१९ च्या लॉकडाऊन नंतर पुन्हा उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसला होता.
सोयगावसह तालुक्यात उन्हाची तीव्रता अचानक वाढली त्यामुळे नागरिकांना पुन्हा घरातच बसून राहा असे संदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आल्याने कोविड-१९ च्या लॉकडाऊनमध्ये घरातच तब्बल ६० दिवस बसलेल्या शेतकऱ्यांना व मजुरांना पुन्हा उन्हाच्या तीव्रतेने रविवारी पूर्ण दिवस घरातच काढावा लागला.उन्हाच्या तीव्रतेत सोयगावसह संपूर्ण तालुका होरपळला असतांना मात्र जमिनीतून चक्क उष्णतेच्या झळा बाहेर पडत असल्याचे रविवारी अनुभवास मिळाले होते.काही भागात जमिनी तप्त झाल्याने जमिनींना भेगा पडल्याचे पहावयास मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती.
सोमवारी तापलेल्या उन्हामुळे ग्रामीण भागातील शेत जमिनींना भेगा पडल्याने अचानक शेती भेगाळल्याने ऐन खरिपाच्या हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता वाढली होती मात्र अचानक जमिनीला भेगा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
सोयगावसह तालुक्यात अजून दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.त्यामुळे अजून दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.एकीकडे कोरोना संसर्गाचा एकही संशयित रुग्ण नसलेल्या सोयगाव तालुक्याला मात्र उन्हाच्या तीव्रतेची धास्ती पसरली असून सोयगाव तालुक्यात उष्माघाताने मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने कोरोना संसर्गापेक्षा उष्माघाताच्या मृतुयुची चिंता प्रशासनाला सतावत आहे.
हवेतही उष्णतेच्या झळा अनुभवास मिळाल्याने सोयगाव तालुक्यात रविवारी उच्चांकी तापमानाने कहर केला होता.