अर्जुनी मो.:राहुल उके― गोंदिया जिल्ह्या अंतर्गत रेती घाट भरपूर असूनही लिलाव न झाल्याने, बांधकामास लागणारा महत्त्वाचा घटक असलेल्या रेती अभावी शासकीय, निमशासकीय व खाजगी कामे पूर्णपणे ठप्प पडलेली आहेत. त्यामुळे हजारो बांधकामगारांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. यावर कुठल्याच लोकप्रतिनीधींचे किंवा प्रशासनाचे लक्ष नाही. रेती कदाचित मिळालीच तर अव्वाच्या सव्वा भावाने मिळत आहे. अशावेळी ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहेत आणि जूने राहते घर फोडून घरकुल बांधण्याच्या तयारीत आहेत, अशा बेघरवाल्यांनी काय करावे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाउन करण्यात आले असताना, शासनानी अर्धवट बांधकामे व घरकुल पूर्ण करावयास परवानगी तर दिली आहे मात्र, रेती घाटांचे लिलाव केले नाही, तर रेती कुठून मिळणार? रेतीच मिळणार नाही तर अर्धवट वा घरकूलाचे बांधकामे कधी पूर्ण होणार. आणि येत्या काही दिवसातच पावसाळ्यास सुरुवात होणार, मग ‘घरकुल’ वाले राहणार कुठे?