वंदेभारत मिशन उपक्रमांतर्गत तीन हजारांहून अधिक नागरिक परदेशातुन महाराष्ट्रात

मुंबई दि.३०:आठवडा विशेष टीम― वंदेभारत मिशन उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात २६ फ्लाईट्सच्या माध्यमातून ३ हजार ४५९ नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ११३७ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १५७२ असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ७५० इतकी आहे. दि. ७ जून २०२० पर्यंत साधारणत: आणखी सहा फ्लाईटस येणे अपेक्षित आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया या देशातून प्रवासी आले आहेत.
बृहन्मुंबईतील प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांकडून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याची कार्यवाही केली जात आहे.
आलेल्या नागरिकांचे कडक क्वारंटाईन होईल यावर प्रशासनाचे कडक लक्ष असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात असून या नागरिकांचा प्रवासी पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे पार पाडत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.