स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेले मास्क वापरून कोविड विरुद्ध लढाईत त्यांच्या सक्षमीकरणा साठी भूमिका बजावण्याचे सिईओ अजित कुंभार यांचे आवाहन

बीड दि.३०:आठवडा विशेष टीम― कोविड -१९ या विषाणू प्रतिबंधासाठी आतापर्यंत 01 लाख 48 हजार 990 मास्कची निर्मिती केली असून सदर मास्क अत्यंत वाजवी दरामध्ये विक्री करून त्याद्वारे 19 लाख 19 हजार 207 रुपयांची विक्रमी उलाढाल केली आहे. स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेले मास्क वापरून कोविड विरुद्धच्या लढाईत महिला स्वयंसहाय्यता गटांच्या सक्षमीकरणासाठी आपणही आपली मोलाची भूमिका बजावू शकता असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

भविष्यात कोविड -१९ या विषाणू विरुद्धच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर मास्कची आवश्यकता असून यामध्ये बीड जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता गटांमार्फत जिल्ह्यातील तसेच राज्यातील नागरिकांना वाजवी किमतीत मास्क उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर नियोजन करण्यात आले आहे सुचना व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

सध्या कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक काळजी घेणे अत्यावशक असून स्वत:ला व इतरांना संसर्ग होऊ नये याकरिता तोंडाला मास्क वापरणे गरजेचे झाले आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यामधील महिला स्वयंसहायता गटानी सक्रिय सहभाग नोंदवून आतापर्यंत ०१ लाख 48 हजार 990 मास्कची निर्मिती केली असून सदर मास्क अत्यंत वाजवी दरामध्ये विक्री करून त्याद्वारे 19 लाख 19 हजार 207 रुपयांची विक्रमी उलाढाल केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना माफक दरामध्ये मास्क उपलब्ध झाले असून लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये देखील स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला आहे. विविध सामाजिक संस्था, ग्रामपंचायती आणि शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा स्वयंसहायता गटाने उत्पादित केलेले मास्क वापरण्यास सुरुवात झाल्याने अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक हातभार लागण्यास मदत झाली आहे. त्याच बरोबर मास्क विक्रीतून कोरोना विरुध्च्या लढाईत मोलाची भूमिका बजावत असल्याच्या सामाजिक भावनेतून ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास देखील वाढीस लागलेला आहे.

ग्राम विकास विभागांतर्गत ‘उमेद’ या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब, वंचित, विधवा, अपंग, एकल, अति गरीब अशा कुटुंबातील महिला एकत्र येऊन स्वयंसहायता गट स्थापन केला जातो. आजमितीस ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात जवळपास दोन लक्ष कुटुंब अभियानाशी जोडली गेली आहेत.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.