राजकीय नेते आणि प्रशासनाला निवेदन देऊन कंटाळलेल्या ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून केला रस्ता― डॉ.गणेश ढवळे

लोकप्रतिनिधी एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल गणेशनगर वस्ती मधिल ५० कुटुंब आणि लिंबागणेश येथिल १२ कुटुंबांनी जिल्हा प्रशासन दरबारी खेटे मारून व राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवुन कंटाळलेल्या ग्रामस्थांनी स्वखर्चातुन वर्गणी करून रस्ता करण्यास सुरुवात केली आहे.

बाळकृष्ण आवसरे ,ग्रामस्थ

लिंबागणेश ते बेलगाव हा जुना शिवरस्ता असुन गणेशनगर व लिंबागणेश येथिल एकुण ६० कुटुबांना रहदारीचा हा एकमेव रस्ता आहे. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून जावे लागते.प्रशासन आणि राजकारणी यांना सांगून दमलो. शेवटी वर्गणी गोळा करून रस्ता करायला सुरुवात केली.

संजीवनी आवसरे ,माजी उपसरपंच

पावसाळ्यात शाळेतील मुलांना चिखल तुडवीत जावं लागतं, रस्ता नसल्याने शाळा बुडवावी लागते. आठवडी बाजाराला अडचण येते म्हणुन पदरचे पैसे खर्च करून रस्ता तयार करत आहोत.

मधुकर थोरात , ग्रामस्थ

गणेशनगर येथिल ग्रामस्थांनी विनंती केली म्हणून माणुसकीच्या नात्याने पावसाळ्यात अडचण होऊ नये शेजारधर्म म्हणुन माझ्या शेतातुन रस्ता करून देण्यात आला आहे,पुढच्या पावसाळ्याच्या अगोदर कागदोपत्री तहसिलदार मार्फत मोजणी करून रस्ता करावा.

विजयाबाई थोरात , दलितवस्ती

लिंबागणेश येथे पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे दलित वस्ती मधिल महिलांना बाळु काका यांच्या बोअरवेल वरुन पाणी आणावे लागते. पावसाळ्यात चिखलामुळे त्रास होतो, पदरचा पैसा खर्च करून रस्ता केल्यामुळे शासनाने दखल घ्यावी.

चंद्रकांत आवसरे/रमेश/कृष्णा वायभट

माजी आमदार जयदत्त आण्णा क्षीरसागर, आ.विनायक मेटे , जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र मस्के ,या सर्वांना निवेदन देऊन त्यांचे उंबरठे झिजवले परंतु नुसतंच करतो असं पोकळ आश्र्वासन देत राहीले.गेल्या १८ वर्षांपासून पावसाळ्यात या अडचणींचा सामना आम्ही करत आहोत. एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे म्हणून शेवटी आम्ही वर्गणी गोळा करून रस्ता तयार करायला सुरुवात केली.

लेनाजी गायकवाड , शिक्षक

मी शिक्षक असुन लिंबागणेश येथे १५ वर्षांपासून सभाष कोचिंग क्लासेस सुरू आहेत. बेलगांव-गणेशनगर – लिंबागणेश येथिल ४ ती ते १० वी पर्यंतची मुले क्लासेसला येतात परंतु रस्त्याअभावी पावसाळ्यात क्लासेस बुडतात,पर्यायाने शिक्षणाचे नुकसान होत असे. मुलांच्या शिक्षणासाठी ग्रांमस्थांनी वर्गणी गोळा करून रस्ता करण्याचे ठरवले ही कौतुकास्पद बाब आहे.

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

लिंबागणेश सारख्या जिल्हा परिषद सर्कलच्या गावातील वस्तीवरील ग्रांमस्थांनी वारंवार विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनवणी करून सुद्धा रस्ता होत नसेल आणि लिंबागणेशचे राजकीय पुढारी म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीप्रमाणे अवस्था झाली असल्याचे संतप्त ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे.त्यातूनच मुलांचे शिक्षण , दुधव्यवसाय , भाजीपाला , आठवडे बाजार आदि.कारणामुळे पावसाळ्यापूर्वी वर्गणी गोळा करून रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले आहे.प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली नाही तर राज्यमार्ग ५६ मांजरसुंभा ते पाटोदा चक्काजाम आंदोलन भविष्यात डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली करण्याचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अध्यक्ष जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, रस्ते, विकास मंत्री , ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना दिले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.