नंदुरबार दि.०१:आठवडा विशेष टीम― जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 6 वर्षाच्या चिमुकलीसह 66 वर्षीय वयोवृद्धाने कोरोनावर मात केली आहे. या दोघांसह एकूण 9 रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, डॉ. के.डी. सातपुते सह जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.भोये यांनी कोरोना रुग्णाना पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप दिला. कोविड संसर्गमुक्त झालेल्या रुग्णात रजाळे येथील चिमुकलीसह 28 वर्षीय व 55 वर्षीय महिलांचा तसेच 31, 35 आणि 66 वर्षे वयाच्या पुरुषांचा समावेश आहे.
शिंदखेडा तालुक्यातील 35 वर्षीय पुरुष रुग्ण आणि जिल्हा रुग्णालयातील 2 कर्मचारीदेखील संसर्गमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात उपचारानंतर संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 28 असून 3 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. अन्य 3 कोरोना बाधितांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
कोरोना हा रोग उपचाराअंती बरा होत असल्याने नागरिकांनी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.