बुलढाणा: पीक कर्जाचे जास्तीत जास्त वितरण १५ जूनपर्यंत पूर्ण करा― पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा दि.०१:आठवडा विशेष टीम― मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात हजेरी लावत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतांची पूर्व मशागत करून खरीप पेरणीसाठी शेती सज्ज केली आहे. बियाणे, खते, किटकनाशके आदी कृषि निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यासाठी त्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून दिली पाहिजे. जिल्ह्यात बँकांनी पात्र शेतकऱ्यांना येत्या 15 जूनपर्यंत त्यांच्या उद्दिष्टाच्या जास्तीत जास्त पीक कर्ज वितरण पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पिक कर्ज वितरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार सर्वश्री संजय गायकवाड, राजेश एकडे, आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन आदींची उपस्थिती होती.

महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वितरण करण्याचे सूचित करीत पालकमंत्री म्हणाले, कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वितरण करावे. तसेच कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या मात्र अजून यादी न आलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज वाटप करण्याचे याआधीच शासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्ज वितरण करावे. पिक कर्ज वितरण करताना कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्क किंवा रूमाल तोंडावर असणे, सॅनिटायझरचा वापर आदी बाबी कटाक्षाने पाळाव्यात. ग्राम, तालुका स्तरीय समित्यांनी शेतकरी कर्ज घेणे, पीक कर्ज कागदपत्रे आदीबाबत कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना सहज होईल अशी कार्यपद्धतीचा अवलंब करावा.

यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी पिक कर्ज वाटपाबाबतची माहिती दिली. बँक निहाय पिक कर्ज वितरणाचा आढावा याप्रंसगी घेण्यात आला. जिल्ह्यात 30 मे पर्यंत 22 हजार 610 खातेदार शेतकऱ्यांना 173.03 कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरण करण्यात आले. बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उत्तम मनवर, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण आदींसह राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.