ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

चक्रीवादळाच्या व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे―पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी दि.०१:आठवडा विशेष टीम― चक्रीवादळ आणि कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी साधन सामुग्रीसह सज्ज रहावे. रेल्वे, रस्ते वाहतूक, महामार्गाची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावीत असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये आयोजित केलेल्या मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे, वैशाली राजमाने तसेच शासकीय व जिल्हा परिषदेचे सर्व संबंधित खाते प्रमुख उपस्थित होते.

चक्रीवादळाचा धोका वाढला असून सर्व यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहावे असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गाची 85 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्गाबाबत भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. जिल्ह्याच्या संपर्कासाठी महत्त्वाचे घाट रस्ते सुरू राहण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. घाट मार्गावर कोसळणाऱ्या दरडींबाबतची माहिती तातडीने मिळावी व त्या हटवता याव्यात. तसेच रस्त्यावर पडणारी झाडे, मुख्यतः आंबोली घाटामध्ये, त्वरीत हटवता यावीत यासाठी महसूल, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवावा. शोध व बचाव साहित्य अद्ययावत ठेवावे. आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथरोग नियंत्रणाबाबत दक्षता घ्यावी. स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. पुरामुळे दूषित होणाऱ्या पाणीसाठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवावी. वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्याबाबत संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. पूर क्षेत्रातील नागरिकांना निवाऱ्यासाठीची यंत्रणा तयार ठेवावी, पावसाळा कालावधीत पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याच्या विसर्गाची माहिती विहित वेळेत नदी काठच्या गावांना द्यावी, विशेषतः तिलारी धरण क्षेत्रामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्क रहावे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा व विसर्ग यांची दैनंदिन माहिती महसूल विभागास व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळवावी, मस्त्य विभागाने पर्ससिन नेट मासेमारीस आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात आदी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी या बैठकीत केल्या.

खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले, महामार्गामध्ये ज्यांच्या जमीने गेल्या आहेत त्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने देण्यात यावेत, महामार्गाबाजूच्या पाण्याचा निचरा होण्याचे काम तात्काळ पूर्ण करा. जिल्ह्यामध्ये संभाव्य भुस्खलनाचा धोका ओळखून त्याप्रमाणे यंत्रणा कार्यरत ठेवावी. एस.टी महामंडळाने बस फेऱ्यांचे नियोजन करुन जनतेला सेवा उपलब्ध करुन द्यावी असे सांगून खासदार निधी लवकरात लवकर खर्च करावा अशा सूचना दिल्या.

या बैठकीस विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते. शेवटी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख राजश्री सामंत यांनी आभार मानले.

या बैठकीनंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी कुडाळ येथे महामार्गाच्या कामाची पहाणी केली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता सलिम शेख कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, महामार्ग ठेकेदाराचे प्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी महामार्गाच्या दोन्ही बाजूनी पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल या पध्दतीने ड्रेनेज सिस्टीम तयार करावी. महार्गासाठी अधिग्रहित केलेल्या सर्व जमिनी ताब्यत घ्याव्यात, मंजूर सर्व मोबदले तातडीने द्यावेत. महामार्गावर अपघात क्षेत्र तयार होणार नाही तसेच पावसाळ्यात महामार्गावर पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. अनाधिकृत कट बंद करावेत, लवकरात लवकर महामार्ग सुरु होईल याचे नियोजन करावे अशा सूचना दिल्या.

झाराप ता.कुडाळ येथे माणगाव फाट्यावर सर्कल उभारण्याबाबत ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे सल्लागार, कार्यकारी अभियंता व ठेकेदार यांच्या सोबत रत्नागिरी येथे बैठक घेवून निर्णय घेण्याविषयी पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button