सोयगाव,दि.१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कर्जप्रकरणासाठी दस्तावेजसाठी लागणाऱ्या मुद्रांक पेपरची सोयगावला तुटवडा निर्माण झाल्याने पिककर्जासाठी मुद्रांक पेपर घेण्यासाठी शेतकऱ्यांना जळगाव जिल्ह्यात जावे लागत आहे.त्यातच कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सिमाबंद असल्याने जळगाव जिल्ह्यात सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वाट बंद करण्यात आली असल्याने ऐन खरिपाच्या पेरण्यांच्या तोंडावर शेतकऱ्यांचे पिककर्जाचे दस्तावेज मुद्रांक पेपर अभावी अपूर्ण राहिले आहे.
खरिपाच्या पिककर्जासाठी सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांची कागदपत्रांची पूर्तता करण्याची लगभग सुरु झालेली असतांना अचानक सोमवारी कर्जाच्या दस्तावेजासाठी लागणारी शंभर रु.ची मुद्रांक पेपरचा तुटवडा निर्माण झाल्याने सोयगावात शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.कर्जासाठी आवश्यक लागणाऱ्या मुद्रांक पेपरचा जिल्ह्यावरूनच लॉकडाऊनमुळे पुरवठा होत नसल्याने सोयगाव तालुक्यातील शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.सध्या बँकांमध्ये पिक कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची धावपळ सुरु झालेली आहे,बँकांनी सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयगावला गर्दी केली आहे,मात्र मुद्रांक पेपर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे पिक कर्जाचे दस्तावेज अपूर्ण राहत आहे,बँकांनी मात्र मुद्रांक पेपर शिवाय पिक कर्जाच्या संचिका स्वीकारणे नाकारले असून एकीकडे बँकांचा दस्तावेजाला मुद्रांक पेपर जोडणी करण्याचा तगादा आणि दुसरीकडे मात्र मुद्रांक पेपर मिळत नसल्याने सोयगाव तालुक्यात मुद्रांक पेपर अभावी पिक कर्जाच्या प्रक्रियेला ब्रेक लागले आहे.
सोयगाव तालुक्यात अद्यापही मुद्रांक पेपरचा औरंगाबाद वरून पुरवठा झालेला नसून लॉकडाऊनअभावी सोयगावला पुरेसे मुद्रांक पेपर पुरवठा झालेले नसल्याचे प्रशासनाने सांगितले असून येत्या चार ते पाच दिवसात मुद्रांक पेपरचा पुरवठा होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार ठप्प-
मुद्रांक पेपरचा तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांची खरेदी विक्रीची कामे ठप्प झालेली असून त्यामुळे ऐन कोरोना संसर्गाच्या नुकत्याच कारभार सुरु झालेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार मुद्रांक पेपर अभावी ठप्प झाला आहे.