बीड दि.२:आठवडा विशेष टीम―आष्टी,पाटोदा व शिरुर का. तालुक्यातील शेतकऱ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, कडा, ता.आष्टी येथे नोंदणी करावी. पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, पाटोदा येथील मार्केट यार्डात व शिरुर (का.)तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती,पाटोदाचे सब मार्केट यार्ड , शिरुर का. येथे नोंदणी करावी. असे शिवाजी बढे ,जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,बीड यांनी कळविले आहे.
आष्टी,पाटोदा व शिरुर (का.) तालुक्यात शासकिय हमी दराने कापुस खरेदीसाठी केंद्रे जिनिंग प्रेसिंग फैक्ट्री उपलब्ध नाहीत, त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळच्या गेवराई व बीड कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणीचा पर्याय देण्यात आला आहे. परंतु सध्याच्या कोरोना संसर्गाचे व लॉकडाऊनचे परिस्थितीत या तालुक्यातील शेतकऱ्यांना बीड व गेवराई येथे नोंदणीसाठी जाणे-येणे गैरसोईचे ठरत आहे. त्यामुळे आष्टी,पाटोदा व शिरुरा का. तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील बाजार समितीकडे नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्देश दिेले आहेत.
संबंधित बाजार समित्यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी यापुर्वी दिलेल्या सुचनेप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे घेऊन नोंदणी करावी. व नोंदणीची मुदत संपल्यानंतर नोंदणीच्या यादी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता.आष्टी पाटोदा शिरुराका. तसेच ,महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या विभागीय कार्यालय, परळी वै आणि सी.सी.आय.,औरंगाबाद या कार्यालयासह जिल्हाधिकारी,बीड यांना सादर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ म.व सी.सी.आय. यांचे मार्फत शासकिय हमी दराने कापुस खरेदी चालु आहे.ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप FAQ दर्जाचा कापुस विक्रीसाठी शिल्लक आहे मात्र त्यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीकडे कापुस विक्रीसाठी नोंदणी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांची नोंदणी दि.१ ते दि.३ जून २०२० या कालावधीत करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी, बीड यांनी सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांना दिल्या आहेत.