मुंबई दि.३:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात हिंदुस्थान युनिलिव्हर लि. कंपनीकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत प्राप्त झाली आहे. २८ हजार ८०० टेस्टिंग किटसह, व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, आदी संसाधनांचा यात समावेश आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीचे आभार मानले.
हिंदुस्थान युनिलिव्हर लि. कंपनीने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत केली असून यात ५.०४ कोटी रुपयांच्या २८ हजार ८०० टेस्टिंग किटस, तसेच ५ कोटी रुपये किंमतीचे व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, ऑक्सिजन सकेंद्रक (oxygen concentrators) यांचा समावेश असलेली वैद्यकीय संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. कंपनीचे बिझिनेस ॲन्ड कम्युनिकेशन हेड श्री. प्रसाद प्रधान यांनी पत्र पाठवून ही माहिती कळवली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी महापालिका आणि खासगी रुग्णालयांना ही स्वछता आणि आरोग्यविषयक साधने मदतीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्याचे म्हटले आहे.
कोविड विषाणूच्या विरोधात लढतांना आतापर्यंत राज्यातील जनतेने तसेच राज्यातील उद्योजक, व्यापारी वर्ग, स्वंयसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस आणि सर्वच क्षेत्रातील व्यक्ती-संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सहकार्याच्या या हजारो हातांमुळे कोरोना विषाणू विरोधात लढतांना शासनाला अधिक बळ प्राप्त झाले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लि. ने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागास आरोग्य विषयक संसाधने उपलब्ध करून दिल्याने कोविड योद्धे म्हणून लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नक्कीच मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून हिंदुस्थान युनिलिव्हर लि. ला त्यांनी मनापासून धन्यवाद दिले आहेत.