बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारणविशेष बातमी

संघर्षाच्या अग्नितूनही बाहेर निघणार ; फक्त तुमची साथ पाहिजे–पंकजाताई मुंडे यांचा फेसबुकवरून ‘लाईव्ह’ संवाद

मुंबई दि.०३:आठवडा विशेष टीम― मी खचले नाही. स्वाभिमानी असणं हे सन्मानाचं लक्षण आहे. पराक्रम, परिश्रम, सत्य आणि संघर्ष ही शस्त्रे घेऊन भविष्याची वाटचाल करणार आहे, मला फक्त तुमची साथ हवी आहे, संघर्षाच्या अग्नितूनही आपण बाहेर निघू आणि अत्यंत आत्मविश्‍वासाने वाटचाल करू असे सांगत तुम्ही राहणार ना माझ्यासोबत ? अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आज फेसबुक लाईव्हवरून संवाद साधला. वंचितांना न्याय देण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्न मला पूर्ण करायचयं, मी उतणार नाही, मातणार नाही असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त पंकजाताई मुंडे यांनी आज फेसबुक लाईव्हवरून विविध मुद्द्याद्वारे संवाद साधला. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी समर्पित सेवेचा यज्ञ करण्याचे आवाहन केले. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आजचा दिवस काळाने आपल्यावर आणलेला आहे. आपल्या महत्वाच्या व्यक्तीला आजच्या दिवशी आपण गमावलं आहे. म्हणून ३ जून आपल्यासाठी काळा दिवस आहे. मुंडे साहेबांचे संस्कार असे होते की, हरायचे नाही, लढायचं, रुकायचे नाही, कोणापुढे कधीही झुकायच नाही, हे मुंडे साहेबांनी आपल्या सर्वांना शिकवले. मुंडे साहेबांच्या या शिकवणूकीला अनुसरुन जो जो संघर्ष करतो त्यासाठी हा एक प्रेरणा दिन आहे. मला आज खूप दु:ख होतय. कारण मी आज मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेवू शकले नाही. आज मुंबईत वादळाची स्थिती असल्याने नेटवर्क नाही, अशा नेटवर्कच्या समस्या अनेकदा येतात, पण तुमच्या माझ्यातील कनेक्शन कोणीही तोडू शकत नाही. मुंडे साहेबांच्या अनेक आठवणी आहेत.

सामान्य माणसांसाठी लढणारा व्यक्ती म्हणजे मुंडे साहेब होते. लोकांसाठी मी संघर्षयात्रा काढली. मुंडे साहेबांच्या मृत्यूची उद्विग्नता सार्‍यांमध्ये दिसत होती. मुंडे साहेबांची विचारधारा घराघरांपर्यंत पोहचवून भाजपची सत्ता लोकांनी आणली. मी सत्तेत गेले तेव्हा खूप लोकांना आनंद झाला. मंत्रालयाचा मजला दुमदूमून जात होता. ९० टक्के लोकांचे प्रश्‍न सोडवले, मात्र १० टक्के लोकांचे प्रश्‍न मी सोडवू शकले नाही, त्याबद्दल त्यांची मी क्षमा मागते, ती खंत माझ्याही मनात आहे असेही पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या. मी पराभवाने निराश होणारी नाही, गोपीनाथ मुंडेंचे रक्त माझ्यात आहे. आज माझ्यावर प्रेम करणार्‍यांसमोर अनेक प्रश्‍न आहेत. पंकजा मुंडे आता काय करतील, पंकजाताईंचे राजकारणात स्थान काय? पंकजाताई आम्हाला भेटतील का? किंवा पक्षात पंकजाताईंचे स्थान काय? असे अनेक प्रश्‍न लोकांच्या मनात आहेत. पण माझ्या मनात एकही प्रश्‍न नाही. कारण माझ्याकडे प्रचंड आत्मविश्‍वास आहे की तुम्ही माझ्यासोबत असाल तर कोणतेही रणांगण माझ्यासाठी कधीही धोक्याचे असणार नाही. कारण तुम्हीच माझी कवचकुंडले आहेत.

नव्याने सुरवात करायची

पंकजा मुंडे दगाबाज असू शकत नाही. मी पक्ष सोडणार, आमुक तारखेला निर्णय जाहिर करणार असं सांगितलं जातं, मी असा काही निर्णय घ्यावा यासाठी हे केले जाते, पण विश्‍वास ठेवू नका, पंकजा मुंडे पक्ष सोडणार हे तुम्ही ठरवणारे कोण? पंकजा मुंडे काय करणार? हे पंकजा आणि कार्यकर्ते ठरवतील.
मी खचलेले नाही, मी करोनामुळे घरात आहे. प्रशासनाने मला विनंती केली. त्यामुळे मी गोपीनाथगडावर आले नाही.आपल्या लोकांना काही होवू द्यायचे नाही, सर्व जण सुरक्षित रहावेत म्हणून मी गोपीनाथगडावर आले नाही.तुम्हाला जरी वाटत असले की पंकजाताई काय करतात, पण मी खचून जाणार नाही, आपण नव्याने सुरुवात करायची आहे. भाजपामध्येच गोपीनाथ मुंडेंनी निवडणूक लढवली, पराजय झाला पण ते खचले नाहीत. आमदार म्हणून निवडून आले, शेतकर्‍यांच्या घरात जन्मलेले मुंडे साहेब देशाचे ग्रामविकास मंत्रीपदापर्यंत पोहचले हा इतिहास आहे.

स्वाभिमानी असणं सन्मानाचं लक्षण

सत्तेत असतानाही मला अनेकदा संघर्ष करावा लागला मात्र मी कधीही खचले नाही. परळीच्या पराभवाची चर्चा झाली पण परळीच्या विजयाची चर्चा झाली नाही. राजकारणात पराभव हा चाखावा लागतो. पराभवातूनच शिकता येते. मोठे नेते पराभूत झाले. माझ्या पराभवातून मी दुसर्‍या दिवशी बाहेर पडले, तुम्ही बाहेर पडणार आहात का? असा सवाल करत पंकजाताई म्हणाल्या, स्वाभिमानी असणं हे सन्मानाचं लक्षणं आहे. पद आणि प्रतिष्ठा माणसाला मोठे बनवते. मात्र काही माणसे असे असतात जे पद आणि प्रतिष्ठेला मोठे बनवतात. मला काही नाही पाहिजे, मला केवळ तुमची गरज आहे.

मी जेष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी सामान्य माणसांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी संवाद करते. सर्वपक्षीयांशी मी संवाद ठेवला आहे. सत्तेत नसताना सरकारशी संवाद साधून लोकांचे प्रश्‍न सोडवण्याचे माध्यम आज आपल्याकडे आहे.त्यासाठी मी प्रयत्न करतेय.पंकजाताई म्हणाल्या,आपण सर्वांनी अत्यंत आत्मविश्‍वासाने समाजात वावरायचे आहे. आता राजकारणात बदल झालेला आहे. मीडिया, सोशल मीडिया पॉवरफुल झालेला आहे. लोकांना वाट बघायची सवय राहिलेली नाही, पण नेता तो असतो, जो परिस्थितीच्या अधिन न जाता संयमाने निर्णय घेतो, वाटचाल करतो, तुम्ही सर्व जण माझ्या पाठीशी आहेत हा विश्‍वास मला प्रेरणा देतो. मी स्वत:च्या स्वार्थासाठी काही मागत नाही. प्रत्येकाला चांगली अन् वाईट वेळ येत असते. कारण तीच खरी परीक्षा असते, अशा काळात चांगुलपणा सोडू नये असेही त्यांनी सांगीतले.

सेवेच्या यज्ञात समर्पितपणे काम करु

कोरोनाच्या संकटात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने राज्यात अनेक भागात सेवेचा यज्ञ सुरु केला, त्या सर्वांचे मी खूप आभार मानते. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. या सेवेचा यज्ञात तुमच्या सर्वांची साथ पाहिजे. तुमचा हात माझ्या डोक्यावर असल्याशिवाय मला दुसरे काही नको. वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी प्रयत्न केला, आणि भविष्यातही करत राहिल. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर मी माझ्या मनावर दगड ठेवून काम करु शकते तर मी तुमच्यासाठी आयुष्य खर्ची घालू शकते असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

शांततेतच निर्णय घेता येतात

अनेकजण म्हणाले, ताई तुम्ही शांत का? पण शांततेतच निर्णय घेता येतात. शांतेततूनच भविष्याची प्लॅनिंग करता येते. मला आणि माझ्या घरच्यांना कोणत्याही पदावर जाण्याची लालसा नाही. मला तुम्हाला पदावर बसण्याची इच्छा आहे. तुम्हाला न्याय देता येईल यासाठी काम करायचे. भाषण करायची सवय तुटली म्हणून तुमच्याशी संभाषण करतेय. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सेवेचा यज्ञ सुरु केला आहे. सामान्य माणूस, अबला, नारी, झगडणारा तरुण, शेतकरी या सर्वांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

मी जे कमावलं ते तुमच्यामुळेच

तुमच्या आशिर्वादाने मी जगत आहे, मी जीवनात खूप काही गमावलंय ते कायमचं. पण जे कमावलं ते तुमच्यामुळेच. गोपीनाथगड आता आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आज तिथे आपण येवू शकलो नाही पण गड आपल्या घरी आला. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण सार्‍यांनी घरातूनच साहेबांना अभिवादन केले. सकाळपासून अनेकांचे फोन आले. मुंडे साहेबांच्या आवडीचे पदार्थ बनवले आहेत. त्यांच्या प्रतिमेसमोर दिवे लावले, त्यांना अभिवादन केले असे असंख्य लोकांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button