मौजे धानोरा (बु) येथील गायरान जमिनीवरील विस्थापितांचे तात्काळ पुनर्वसन करा ; अन्यथा आंदोलन – फकीरा ब्रिगेडचे जिल्हाधिकार्यांना निवेदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.१०: तालुक्यातील मौजे धानोरा (बु) येथील शासकीय गायरान जमीन गट नं.४८४ मध्ये १९८२ पासुन वास्तव्य करणार्या व शेतमजुर म्हणून उपजिवीका भागविणार्या मातंग समाजाच्या व्यक्तींना १ फेब्रुवारी रोजी शासनाने विस्थापीत केले.यावेळी अनेकांना अपमानास्पद वागणुक मिळाली तसेच मारहाण ही झाली. जबरदस्तीने प्रशासनाने संबंधीत कुटूंबांना त्यांच्या राहत्या घरांपासुन बेदखल केले. त्यामुळे ही कुटुंबे बेघर झाली आहेत.या कुटुंबांचे सर्वांना घरे या योजनेतून पुनर्वसन करून संबंधीतांना उपजिविकेसाठी शेती व राहण्यासाठी घरे मिळावीत अशी मागणी करून याप्रश्नी शासनाने काहीही कार्यवाही केली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही फकीरा ब्रिगेड,बीडचे जिल्हाध्यक्ष अविनाश साठे यांनी दिला आहे.
या बाबत फकीरा ब्रिगेड,बीडचे जिल्हाध्यक्ष अविनाश साठे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणा-या धानोरा (बु) येथील विस्थापीतांची भेट घेतली.त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.त्यांचे प्रश्न समजावून घेवून त्यांना धीर दिला.व फकिरा ब्रिगेड ही संघटना आपल्यासोबत आसल्याचे सांगितले. तसेच त्याच दिवशी शुक्रवार,दि.८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाई तालुक्यातील मौजे धानोरा (बु) येथील शासकीय गायरान जमीन गट नं.४८४ मध्ये १९८२ पासुन वास्तव्य करणार्या व शेतमजुर म्हणून उपजिविका भागविणार्या मातंग समाजाच्या गोर-गरीब लोकांना प्रशासनाने अचानक कार्यवाही करत त्यांच्या शासकीय गायरान जमीन गट नं.४८४ या वहिती जमिनीतून बेदखल केले.सन २०१६ पासून या ठिकाणी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.यांचा नियोजित प्रकल्प होत आहे. विस्थापित हे भूमिहिन आहेत.तसेच ते मातंग समाजातील असून प्रशासनाने त्यांना कोणतीही पुर्वसुचना न देता अचानक कार्यवाही करून अपमानास्पद वागणूक देवून महिलांचे कुटुंबातील इतर व्यक्तींना मारहाण केल्याचे या पिडीत कुटूंबांनीच फकिरा ब्रिगेडला सांगितले आहे.तसेच संंबंधितांना पोलिस बळाचा वापर करून बेघर करण्यात आले.या प्रकरणाची चौकशी व्हावी संबंधीत अधिकार्यांवर कार्यवाही व्हावी आदी मागण्यांचा सदरील निवेदनात समावेश आहे.निवेदनावर फकीरा ब्रिगेड बीडचे जिल्हाध्यक्ष अविनाश साठे,मराठवाडा संघटक महादेव गव्हाणे, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष विजय धबडगे,केजचे तालुकाध्यक्ष प्रकाश खंडागळे,अंबाजोगाईचे तालुकासचिव संतोष माने,अंबाजोगाईचे तालुकासंघटक पांडुरंग गादेकार,धारूरचे तालुकाउपाध्यक्ष विकास कांबळे, अंबाजोगाईचे शहरध्यक्ष चंद्रकांत घोडके, अंबाजोगाईचे शहरउपाध्यक्ष सचिन होके,अनिकेत साठे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.