शिर्डी:आठवडा विशेष टीम― निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याच्या विविध भागात घरांचे तसेच शेतीचे नुकसान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व अकोले परिसरातील नुकसानीची पाहणी महसूल मंत्री बाळासाहेबत थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून केली. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानींचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
अकोले तालुक्यातील लहित बु. येथील सागर पांडुरंग चौधरी यांच्या घराची भिंत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील वारसांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आमदार डॉ.किरण लहामटे यांच्याहस्ते शासकीय मदतीपेाटी सानुग्रह अनुदानाचा चार लाख रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.
चक्रीवादळामुळे घराची भिंत पडून मृत्यू झाल्यानंतर चौधरी कुटुंबातील वारसांना फक्त एका दिवसात शासकीय मदत मिळवून देऊन महसूल विभागाने गतिमान प्रशासनाची जाणीव करुन दिल्याबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
मंत्री महोदयांनी यावेळी चौधरी कुटुंबाच्या घराच्या व परिसरातील झालेल्या नुकसानीची पाहणीसुद्धा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप गोसावी, नायब तहसीलदार श्री.महाले, तलाठी श्री.कुंदेकर, मंगेश फाफाळे उपस्थित होते.